

पुणे: इंदापूर येथील एका वृद्ध रुग्णाने मांसाहार करताना चुकून हाडही गिळले आणि ते अन्ननलिकेत अडकले. रुग्णाचे वय 70 वर्षे असल्याने आणि हाड अन्ननलिकेत धोकादायकरीतीने अडकल्याने गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी एंडोस्कोपी करून उपचार केले. डॉक्टरांनी रुग्णाच्या अन्ननलिकेत स्टेंटही बसवला.
रुग्णाच्या शरीरात हाड अडकलेली जागा अत्यंत धोकादायक होती. हाडामुळे हृदय, महत्त्वाच्या रक्तवाहिन्या किंवा अन्ननलिकेत आणखी मोठे छिद्र करू शकले असते. ते हृदयाच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या अगदी जवळ असल्यामुळे प्राणघातक ठरू शकले असते.
हाडाने अन्ननलिकेला छिद्र पडल्यामुळे त्यातून अन्न किंवा पाणी इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये जाऊन अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, डॉक्टरांनी गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना रुग्णाने चुकून हाड गिळल्याने त्यांना खूप वेदना होत होत्या. स्थानिक रुग्णालयात नीट उपचार न झाल्याने रुग्णाला ससून रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे हाडाची अचूक जागा शोधून काढली. हाडाचे आकारमान 5.3 बाय 3 सेंमी होते आणि ते आडवे अडकले होते.
रुग्णाचे वय जास्त असल्याने एंडोस्कोपीद्वारे हाड काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया 27 फेब्रुवारी रोजी शल्यविशारद (सर्जरी) विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पद्मसेन रनबागळे यांच्या नेतृत्वाखाली कान-नाक-घसा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल ठाकूर, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर यांच्या टीमने केली.
ज्येष्ठ नागरिकाची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. रुग्णाचे वय, हाडाची जागा आणि संभाव्य धोके अशी परिस्थिती असल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवून एंडोस्कोपीद्वारे यशस्वीरीत्या हाड बाहेर काढले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय