

ठळक मुद्दे
'मुळातून माणूस पुरस्कार' 'रिंगण'चे संपादक सचिन परब यांना प्रदान
इंजिनिअर ते पत्रकारितेचा प्रवास उलगडला
समाज आणि देश हा जातीधर्मात अडकून पडला आहे- सचिन परब
Sarad Majkur Mulatun Manus Award 2025 Sachin Parab
पुणे : 'आपला समाज आणि देश हा जातीधर्मात अडकून पडला आहे. पण, यापेक्षा आपण प्रेम ही जात आणि धर्म मानला पाहिजे, त्यापेक्षा मोठे काहीच नाही. भक्ती म्हणजेच प्रेम असे संतांनी सांगितले आहे. प्रेम ही जबरदस्त गोष्ट असून, तो एक विचार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात जातधर्मापेक्षा प्रेमाला महत्त्व दिले पाहिजे. प्रेम करता येणे यालाच 'माणूसपण' म्हणतात,' असे मत 'रिंगण'चे संपादक सचिन परब यांनी शनिवारी (दि.19) व्यक्त केले.
सारद मजकूरतर्फे माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी देण्यात येणारा 'मुळातून माणूस पुरस्कार' सचिन परब यांना त्यांच्या पत्नी मुक्ता परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी झालेल्या मुलाखतीत परब बोलत होते. तेजस्विनी गांधी आणि अभिजित सोनावणे यांनी परब यांच्याशी संवाद साधला. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला. परब यांनी विविध विषयांवर विचार मांडले.
परब म्हणाले, 'मी इंजिनिअर पण पत्रकारितेकडे वळलो. खूप फिरलो, ते करताना आपली ओळख नेमकी काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मनात अनेक प्रश्न होते, त्या प्रश्नांचा शोध घेण्याचे ठरवले. अनेक आयडियॉलॉजी काय आहेत इथंपासून ते प्रत्येक समाजातील माणसांपर्यंत त्याचा शोध सुरू झाला. हा प्रवास आजही सुरू आहे. महाराष्ट्राच्या मातीची ओळख विधायक कामांची आहे. हीच ओळख आपण नेहमी सांगितली पाहिजे.' या वेळी अमृता देसरडा, महेश थोरवे, विनायक पाचलग, स्वामीराज भिसे, रेणुका कल्पना आदींनी मनोगत केले. प्रसन्न कुलकर्णी यांनी आभार मानले.