नवरात्री 2024 : सप्तशृंगी देवी ; भक्तांचे आराध्य दैवत

मंदिरातील देवीची मूर्ती 150 ते 200 वर्षांपूर्वीची आहे
Saptshringi Devi
सप्तशृंगी देवीPudhari
Published on
Updated on

रविवार पेठेत असलेले सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे पेशवेकालीन मंदिर असून, हे मंदिर पुण्यातील मध्यवर्ती भागात आहे. काची समाजाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी ठिकठिकाणाहून भाविक येतात अन् देवीकडे आयुष्यात मांगल्य आणि आनंद नांदण्याची कामना करतात. मंदिरातील देवीची मूर्ती 150 ते 200 वर्षांपूर्वीची आहे, असे म्हटले जाते. येथील नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतात अन् त्यातही भाविक उत्साहात सहभागी होतात.

देवीच्या मंदिराचा इतिहासही जाणून घेतला पाहिजे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात असलेला प्रांत पूर्वी बुंदेलखंड म्हणून ओळखला जायचा. या बुंदेलखंडचे राजा छत्रसाल आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची भेट झाली. या वेळी राजा छत्रसाल यांच्यासमवेत आलेल्या सैन्यातील काही जण येथेच राहिले. तेव्हापासून काची समाजाचे पुण्याशी नाते जुळले. काची समाज हा शक्ती उपासक असल्याने तुळजापूरची तुळजाभवानी माता आणि नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी देवीची उपासना करण्याची समाजाची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे, तर गणेशखिंड येथेही देवीचे मंदिर आहे. रविवार पेठेतही सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती तांदळा स्वरूपातील आहे. काची समाजातील अनेक पिढ्यांनी देवीची पूजा आणि सेवा केली आहे. 1982-84 साली मंदिराचा जीर्णोद्धार समस्त बुंदेले काची पंचज्ञाती संस्थेचे इंद्रकुमार काची यांच्यासह अनेक व्यक्तींच्या सहकार्याने झाला. संस्थेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात. आता संस्थेचे अध्यक्ष अमर काची आहेत.

पुण्यात मध्यवर्ती पेठ भागात मोठ्या संख्येने काची समाज राहतो. या समाजाचे आराध्य दैवत सप्तशृंगी देवी आहे. समस्त बुंदेले काची पंचज्ञाती संस्थेची 1954 साली धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. लक्ष्मण दयाराम काची यांनी मंदिरासाठी जागा दिली. गंगाराम काची, पंथाराम काची आणि इंद्रकुमार काची यांनी मंदिराचा आणि संस्थेचा विकास केला. समाजाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अन्नदान, मोफत आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम उत्सवकाळात राबविले जातात. मंदिरातील नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. उत्सवात देवीसमोर दहाही दिवस अकरा हजार फळांची आरास करण्यात येते. त्याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रमही होतात. यंदाही उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत असून, त्यात भाविक सहभागी होत आहेत. कोजागरी पौर्णिमेला मंदिरात देवीचा भंडारा आयोजित केला आहे.

सुदेश काची, सचिव, समस्त बुंदेले काची पंचज्ञाती संस्था

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news