

जुन्नर: बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. जुन्नर येथील सत्र न्यायालयाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले होते. तेथे ही भेट झाली.
या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री व बीडचा पालकमंत्री आहे. बीड शहराला 20 दिवस पाणी नाही. यातून काहीतरी मार्ग काढा, हे सांगायला क्षीरसागर आले आहेत. क्षीरसागर हे विरोधी पक्षाचे आमदार असले तरी मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना लोक मला भेटायला येणार. आम्हीही विरोधी पक्षात असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला जायचो.
संदीप क्षीरसागर म्हणाले, अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. बीड नगरपालिकेचा पाणीप्रश्न व इतर समस्या सांगण्यासाठी आलो होतो. मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. परंतु नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मतावर मी ठाम असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले.