कोंढवा : कोंढवा परिसरातील साळुंखे विहार रस्त्यावरील पदपथ सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहेत. पदचार्यांना त्यावर चालणेही अवघड झाले आहे. याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, अधिकार्यांनी अद्यापही दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही अतिक्रमणे तातडीने काढण्याची मागणी परिसरातून होत आहे. साळुंखे विहार रस्ता अतिक्रमणांमध्ये गुदमरलेला मार्ग म्हणून ओळखला जातो.
दपथे गायब, अर्धा रस्ता गायब, बेशिस्त पार्किंग, मोबाईल चोरांचा सुळसुळाट, वाहतूक कोंडी, यासह विविध समस्या या रस्त्यावर आहेत. मात्र, या ठिकाणी कधीही वाहतूक पोलिस दिसत नाहीत. या रस्त्यावर अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. मात्र, महापालिका व पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पदपथावर विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. दुकानदारांनी पदपथावर फलक ठेवले आहेत.
यामुळे आबालवृद्ध नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. महापालिका अधिकारी, कर्मचारी व दुकानदारांमधील अर्थपूर्ण संबंधांमुळे अतिक्रमणे वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने हा रस्ता बकाल झाला आहे. वारंवार छोटे-मोठे अपघातही होत असल्याने प्रशासन कुणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
प्रशासनाचा धाक राहिला नसल्यामुळे साळुंखे विहार रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. पदपथांवर दुकानदारांनी फलक ठेवल्याने पादचार्यांना त्यावरून चालता येत नाही. दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका व पोलिस प्रशासनाने या रस्त्यावरील समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– सुदामराव गायकवाड, रहिवासी, कोंढवा
अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांना तातडीने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण रस्त्याची पाहणी करून पादचार्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळे राहण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
– बाळासाहेब ढवळे पाटील, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय
हेही वाचा