

पुणे : लिंबू हे भाजी नसून फळ आहे. त्यामुळे लिंबाची विक्री आता केवळ फळ विभागातच होणार असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात अडत्यांना लिंबाची विक्री करता येणार नाही. यापूर्वीही असा आदेश बाजार समितीने काढला होता. मात्र, काही कालावधीनंतर माघार घेत भाजीपाला विभागात लिंबू विकण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता तर बाजार समिती प्रशासन या निर्णयावर ठाम राहणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकर्याने रविवारी (दि. 25) भाजीपाला विभागात लिंबू विक्रीला आणले होते. ते माझ्या गाळ्यावर का आणले नाहीत? असा प्रश्न विचारत शेतकर्याला मारहाण झाली होती. याचे पडसाद सर्व बाजारात उमटले.
लिंबू हे फळ भाजी गटात मोडत नाही, तर ते एक फळ आहे. त्यामुळे भाजीपाला विभागात लिंबू न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी फळ विभागातील कोणत्याही अडत्याकडे लिंबू विक्रीसाठी आणू शकतात.
दिलीप काळभोर, सभापती, पुणे बाजार समिती
या पार्श्वभूमीवर भाजीपाला विभागात लिंबू विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना बाजारात लिंबूचे व्यवहार करता येणार नाहीत. मात्र, याच बाजारात लिंबाची किरकोळ विक्री होते. त्याबाबत प्रशासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने शेतकर्यांना बंदी, तर अनधिकृत विक्रेत्यांच्या पाठीशी बाजार समिती ठाम उभी आहे का? असा प्रश्न बाजार घटकांकडून उपस्थित होत आहे.
भाजीपाला विभागातील 20 ते 25 अडते वर्षानुवर्षे लिंबाची विक्री करीत आहेत. बाजार समितीने त्यांना परवानगी दिली आहे. लिंबाच्या विक्रीवरून एखादी घटना घडली असेल, त्यामुळे सर्व अडत्यांना लिंबू विक्री करण्यास मनाई करू नये. मात्र, घडलेल्या घटनेची शहानिशा जरूर करावी. वस्तुस्थिती विचारात घेऊन लिंबूबंदी करू नये.
विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन
मागील वेळी बाजार समितीने भाजीपाला विभागात लिंबाला विक्री बंद केली होती. त्या वेळी शेतकरी ज्या विभागात हवा, तिथे माल विकू शकतो, अशी भूमिका घेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील मैदानात आले होते. त्या वेळी बाजार समितीने निर्णय मागे घेतला होता. आता पुन्हा हा चेंडू शेतकरी संघटनेकडे जाणार का? शेतकरी संघटना मैदानात येणार का? हे येत्या काही दिवसांतच कळेल.