Pune Politics: पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देत सचिन तावरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ’लढणार आणि जिंकणार’ अशी प्रथमपासूनच मोहीम हाती घेत निवडणुकीच्या इराद्याने अगोदरपासूनच उतरलेले भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे बंड अखेर थंड झाले आहे. भाजपचे शहरातील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केली.
तावरे यांनी पर्वती पायथा येथील देवी दर्शन घेऊन, सारसबाग गणपती दर्शन, आहिल्याबाई होळकर, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांच्या मातोश्री शोभा तावरे यांच्यासह अरुण पापळ, युवराज कसबे, जमील भाई, सचिन उकिरंडे व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज भरल्यानंतर तावरे म्हणाले, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मला उमेदवारी दिली नसल्याने माझ्यासह पक्षाच्या 250 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यावर मी निवडणुकीत उतरलो आहे.
दरम्यान, भिमाले यांच्या कार्यालयात मंगळवारी (दि.29) सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. परंतु, केंद्रीय स्तरावर चर्चा केल्यानंतर वरिष्ठ जो निर्णय देतील, तो आम्ही पाळतो.
माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत भिमाले यांनी चांगले काम केले असून भाजपच्या पर्वतीमधील उमेदवार माधुरी मिसाळ यांचे काम सर्व कार्यकर्ते करतील. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेला संपर्क व मुरलीधर मोहोळ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर निवडणूक न लढविता शहरातील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याची घोषणा या वेळी भिमाले यांनी केली.
पर्वतीत 22 उमेदवारांचे 37 अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी (दि.29) शेवटच्या दिवशी एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पर्वतीमध्ये आत्तापर्यंत एकूण 22 उमेदवारांनी मिळून 34 अर्ज दाखल केले असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस 4 नोव्हेंबर असून निवडणूक लढतीचे चित्र त्याचदिवशी स्पष्ट होणार आहे.