आळंदी: आळंदीतील बेकायदा खासगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये होणार्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी (दि. 3) आळंदी येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच बेकायदा संस्थांवर येत्या 48 तासांत कारवाई करा, असे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
तीर्थक्षेत्र आळंदीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदा खासगी वारकरी शिक्षण संस्थांमधून बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी याविरोधात आवाज उठविला होता. आळंदीतील बेकायदा खासगी वारकरी शिक्षण संस्था तातडीने बंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी महिला आयोगाकडे केली होती, त्याची दखल घेत चाकणकर यांनी सोमवारी आळंदीत येत पत्रकार परिषद घेत संबंधित संस्थांवर कारवाईचे आदेश दिले.
धर्मादाय आयुक्त आणि महिला व बालकल्याण विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता अनेक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीत येतात. अनेक संस्था अनधिकृत असून, त्यांच्यावर कोणताही प्रशासकीय अंकुश नाही. अशा संस्थांमध्ये सेवा-सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
या अनधिकृत संस्था तातडीने बंद करा, असे आदेश चाकणकर यांनी प्रशासनाला दिले. या वेळी पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, प्रांताधिकारी अनिल दौंडे, आयोगाच्या सदस्या नंदिनी आवडे, बालक संरक्षण आयोगाच्या जयश्री पालवे, तहसीलदार ज्योती देवरे, नगरपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, सौरभ गव्हाणे आदी उपस्थित होते.
महाराजाबद्दल एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती दाखल होण्यापूर्वी आळंदीतील काही जण मध्यस्थी करून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सदर गुन्हा दाबला जातो, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
आळंदीतील वारकरी संस्थांची आकडेवारी
एकूण विद्यार्थी : 5 हजार
एकूण संस्था : 175
मुलांच्या संस्था : 158
मुलींच्या संस्था : 4
मुले-मुली एकत्रित
असलेली संस्था : 13