

Rohini Khadse on political allegations
पुणे: डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कलमांनुसार चौकशी होणे अपेक्षित आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात पती प्रांजल खेवलकर यांना वकील म्हणून भेटायला गेले होते. त्यांच्याकडून काही माहिती हवी होती. तसेच, प्रश्न उपस्थित करणार्या प्रत्येकाला योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितले.
रोहिणी खडसे यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची पहिल्यांदा भेट घेतली. (Latest Pune News)
खडसे म्हणाल्या, ही भेट केवळ पक्षसंघटनेच्या कामानिमित्त होती. संघटनेत काही नियुक्त्या करायच्या आहेत, त्यासाठी पवारांची भेट घेतली.पती खेवलकर यांच्या जामिनासाठी अर्ज का केला नाही, असा प्रश्न विचारल्यावर खडसे म्हणाल्या, कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार आहोत. त्यानंतरच जामिनासाठी अर्ज केला जाईल.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे न्यायालयाबाहेर वक्तव्य करणे अयोग्य ठरेल. प्रकरणातील आमची बाजू वकिलांमार्फत न्यायालयात मांडली जात आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण भूमिका स्पष्ट करू. सध्या याबाबत कुणाशीही काही बोलणे झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.