जंक्शन : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरा डावा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाण्याचा वेग कमी होत असल्याने कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन कालव्यामधील झाडेझुडपे व गाळ काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या वर्षी परिसरात मे महिन्यात पाऊस सुरू झाला. याच महिन्यात कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरू होते. उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. कालव्यामधे झाडे-झुडपे वाढली आहेत. परिणामी पाण्याचा वेग मंदावत आहे. बर्याच ठिकाणी कालवा खचला आहे. या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यातील लिमटेक येथे कालव्याचा भराव फुटून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कालव्यामधे मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने कालवा कमकुवत झाला आहे. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व दगडधोंडे आहेत, त्यामुळे देखील पाणी कमी दाबाने वाहत आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर झाडे-झुडपे उगवली आहेत. कालव्यालगतच्या रस्त्यावरून दुचाकी गाडी घेऊन जाता येत नाही. पूर्वी जलसंपदा विभागाचे अधिकारी जीपमधून कालव्याची पाहणी करत होते; मात्र गेल्या चार ते पाच वर्षात जलसंपदा विभागाचे अधिकारी कालव्यालगतच्या रस्त्यावरून फिरकलेदेखील नाहीत.
जलसंपदा विभागाने त्वरित दखल घेऊन कालव्यामधील झाडे-झुडपे, गाळ काढून दोन्ही बाजूचे रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्यांनी केली आहे.