

शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांचे दि. 9 नोव्हेंबर रोजी अपहरण करून त्यांची महिलेसोबत अश्लील छायाचित्रे, व्हिडीओ चित्रित केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण खरे आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढविल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
भाऊसाहेब विरा कोळपे (वय 30), मयूर संजय काळे (वय 24) आणि तुषार संजय कुंभार (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. तर संशयित महिला आरोपी पसार झाली आहे. याप्रकरणी ऋषिराज अशोक पवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक केंजळे म्हणाले, घडलेला प्रकार खरा असून आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, तर एक संशयित महिला आरोपी पसार झाली आहे. लवकरच तिला पकडण्यात पोलिसांना यश येईल. आरोपींवर अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार त्यांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. अपहरणाच्या घटनेचा बंगल्यामधील व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. हा बंगला आरोपींच्या बहिणीचा आहे. गुन्ह्यात वापरलेली दोरी, कापड व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, असेही केंजळे यांनी सांगितले.