

पुणे: दुकानदाराला धमकाविल्यानंतर गुन्हा दाखल करत असताना पोलिस चौकीत येऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की करणार्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली.
ही घटना लोहियानगर पोलिस चौकी परिसरात घडली. याप्रकरणी अभिषेक ससाणे, कुणाल ससाणे यांना अटक करण्यात आली, तर त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई संतोष साबळे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहियानगर भागातील एका किराणामाल विक्री करणार्या दुकानदाराला ससाणे याने धमकाविले होते. किराणा दुकानदाराने ससाणेविरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्या वेळी ससाणे, त्याचा मित्र विवेक अडागळे हे लोहियानगर पोलिस चौकीत आले. त्यांनी पोलिस चौकीत गोंधळ घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने पोलिस कर्मचार्यांना शिवीगाळ केली. ससाणे याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. आरोपीने ससून रुग्णालयातही गोंधळ घातल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे करत आहेत.
खंडणीचा गुन्हा दाखल
लोहियानगर भागातील दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून यापूर्वी गुन्हा दाखल असलेला अभिषेक ससाणे, विवेक अडागळे यांच्याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत किराणामाल दुकानदाराने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ससाणे आणि त्याचा मित्र अडागळे सोमवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास दुकानात आले. दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक भारत बोराडे तपास करत आहेत.