भोर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र रायरेश्वरावर 380 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. श्रीक्षेत्र रायरेश्वर येथे शिवकाळानंतर पांडवकालीन शंभू महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्रीगुरू डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या आधिपत्याखाली आणि गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळी विधी विधानस्थापित मंडलपूजन व हवन, गंगापूजन, श्री जननीदेवी पालखी मिरवणूक, श्री रायरेश्वर व जननीमाता अभिषेक, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण, कलशाभिषेक, कलशपूजा व माळ लावणे, परमरहस्य ग्रंथाची सांगता, श्रीगुरू डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांची प्रसाद कीर्तनसेवा, मृदंगमणी प्रभाकर वाशिवले विठ्ठल-रुक्मिणी भजन मंडळ घेराकंजळ यांची भजनसेवा, हळदी-कुंकू समारंभ, जननीमाता महिला मंडळ, ढोल-ताशा लेझीम पथक रायरी व धानवली, श्री रायरेश्वर शंभू महादेव व जननीदेवी मिरवणूक, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार व तानाजी कुंभार यांचे भारुडी भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सोमवारी (दि. 31 मार्च) संपत जंगम यांचे प्रवचन, संगीतमय शिवपाठ,अक्षय वाशिवले यांचे कीर्तन, घेराकंजळ यांचे भजन, तर मंगळवारी (दि. 1 एप्रिल) रुद्राभिषेक, ग्रंथाचे सामूहिक पठण, मूर्ती व कलशाला जलवास, धान्यवास व शयनवास, कलशाची मिरवणूक, संगीतमय शिवपाठ, जगन्नाथ जंगम यांचे प्रवचन, कल्पेश जंगम यांचे कीर्तन व घेराकंजळ भजनाच्या कार्यक्रमासह महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम पार पडले. या वेळी नामदेव महाराज किंद्रे तसेच रायरेश्वर व रायरी ग्रामस्थांसह तालुक्यातील शिवभक्त उपस्थित होते.
रायरेश्वरावर आज हिंदवी स्वराज्य दिन सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तमीला मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्रीक्षेत्र रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिनाचे हे 380 वे वर्ष आहे. त्यानिमित्त शुक्रवारी (दि. 4) सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत भोर तालुक्यातील रायरी या गावातील श्रीक्षेत्र रायरेश्वर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.