

नायगाव: ग्रामसभेच्या अजेंड्यावर विषय नसतानाही तहकूब ग्रामसभेत ऐनवेळी विषय घेऊन खडीमशिनसाठी 2018 ला देण्यात आलेली नियमबाह्य परवानगी पोंढेच्या विशेष ग्रामसभेत बहुमताने ठराव करून रद्द करण्यात आली. तद्नंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत देखील 4 विरुद्ध 2 सदस्य अशा बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.
14 फेब्रुवारी 2025 रोजी कोरम अभावी तहकूब झालेली विशेष ग्रामसभा 21 फेब—ुवारी रोजी घेण्यात आली. पोंढे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर खडीमशिन संदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसेवक आश्लेषा रोकडे यांनी ग्रामसभेचे विषय वाचन केले. सरपंच छाया सोमनाथ वाघले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात झाली. या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, प्रकल्पालगतचे बहुसंख्य नुकसानग्रस्त शेतकरी महिलावर्ग, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता सुरू झालेली विशेष तहकूब ग्रामसभा तब्बल तीन तास वादळी ठरली. 2018 ला तहकूब ग्रामसभेत ऐनवेळी विषय घेऊन प्रकल्पालगतच्या शेतकर्यांना अंधारात ठेवून देण्यात आलेल्या परवानगीवरून प्रकल्प मालक व ग्रामस्थांमध्ये ग्रामसभेत अनेकवेळा वादावादी झाली. लगतच्या शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने शेतकर्यांनी नियमबाह्य दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी लावून धरली.
या वेळी ग्रामस्थांमध्ये देखील वादावादी झाली. तब्बल तीन तास झालेल्या चर्चेअंती प्रकल्पालगतच्या शेतकर्यांनी आक्रमक होत खडीमशिन प्रकल्पाला कोणाची सहमती आहे व कोणाची असहमती आहे अशी उपस्थित ग्रामस्थांमधून मतदान प्रक्रिया घ्या, असा आग्रह धरला.
अखेर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकार्यांना विचारून मतदान प्रक्रिया घ्यायची की नाही हे मी विचारून घेते व नंतर निर्णय घेऊ, असे ग्रामसेवक आश्लेषा रोकडे यांनी सांगितले. वीस मिनिटांची वेळ घेऊन ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले. या वेळी काही ग्रामस्थ सभा सोडून निघून गेले होते.
वरिष्ठांशी संपर्क करून कार्यालयातून बाहेर आल्यानंतर वरिष्ठांनी हात उंच करून मतदान प्रक्रिया घ्यावी, असे सांगितले असल्याचे ग्रामसेवक आश्लेषा रोकडे व उपसरपंच दीपक गायकवाड यांनी सांगितले. तद्नंतर उपस्थित 153 ग्रामस्थांपैकी तब्बल 90 ग्रामस्थांनी हात उंच करून खडीमशिन विरोधात मतदान केले व खडीमशिन व्हावी या बाजूने एकाही ग्रामस्थाने मतदान केले नाही.
काही ग्रामस्थ मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवून निघून गेले.चालू कॅमेर्यासमोर झालेल्या विशेष ग्रामसभेत खडीमशिन विरोधात बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. तद्नंतर 5 मार्च रोजी झालेल्या मासिक सभेत देखील 4 विरुद्ध 2 अशा बहुमताने खडीमशिन विरोधात ठराव मंजूर झाला. उपसरपंच दीपक गायकवाड यांनी आभार मानत ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले. विशेष ग्रामसभेला जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.