जुन्नर: नारायणगावात बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याच्या घटना ताज्या असतानाच आता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात देखील बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात एका इमारतीमध्ये अवैधरीत्या वास्तव्य करणार्या बांगलादेशी महिलेस जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.
दहशतवाद विरोधी शाखा पुणे व जुन्नर पोलिसांकडून शुक्रवारी (दि. 4) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये साथी ऊर्फ सनम मंडल हिस तिच्या लहान बालकासह ताब्यात घेण्यात आले असून, तिचा पती शाहआलम अब्दुल मंडल हा मात्र मिळून आला नाही. त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, दहशतवाद विरोधी शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, विशाल गव्हाणे, रवींद्र जाधव आदींसह जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर पोलिस ठाण्याच्या प्रभारी, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी यांना जुन्नर येथील शिपाई मोहल्ला येथील रिजवान हाईट्स या इमारतीमध्ये बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्यास असल्याची माहिती खबर्यामार्फत प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या इमारतीमध्ये जाऊन सदनिकेची तपासणी केली असता साथी ऊर्फ सनम शाहआलम मंडल ही महिला तिच्या बालकासह मिळून आली.
भारतीय नागरिकत्वाबाबत तिच्याकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक धीरबस्सी यांनी तिच्याकडे अधिकची चौकशी केली असता आपण बांगलादेशी नागरिक असून, बांगलादेशमधील नाव साथी ऊर्फ बिथी अकबर हुसेन (रा. तारा अल्ली, कार्लिगज ढाका, जि. सातखिटा, बांगलादेश) असे सांगितले व पतीसह येथे राहत असून, कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याचे कबूल केले. याबाबत पोलिस अंमलदार विनोद पवार यांनी फिर्याद दिली.
अवैधरीत्या तयार केली बनावट भारतीय कागदपत्रे
भारतात प्रवेश केल्यानंतर भारतीय रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व पॅन कार्ड, तसेच वाहनचालक परवाना व पारपत्र (पासपोर्ट) मिळून आला आहे.