प्राणिसंग्रहालयातील सर्प विभागाचे स्थलांतर; भव्य काचांमधून पाहा सापांसह जलचर प्राणी

प्राणिसंग्रहालयातील सर्प विभागाचे स्थलांतर; भव्य काचांमधून पाहा सापांसह जलचर प्राणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सर्प विभाग लवकरच अंतर्गत नव्या जागेत उभारण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आता अत्याधुनिक अशा काचांमधून सापांसह इतर जलचर प्राणी पाहायला मिळणार आहेत. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सरपटणार्‍या प्राण्यांचा विभाग स्थलांतरित करण्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नवीन भव्य अशी इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या इमारतीचे काम अंतिम टप्प्याकडे जात असून, पर्यटकांना आता पुढील काळात नव्या जागेत सरपटणार्‍या प्राण्यांचा विभाग पाहायला मिळणार आहे. येथे पर्यटकांसाठी आणि सरपटणार्‍या प्राण्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार

सरपटणार्‍या प्राण्यांच्या विभागासाठी आवश्यक अशी प्राणिसंग्रहालयात जागा उपलब्ध नव्हती, आहे त्या जागेतील सर्प विभाग प्राण्यांसाठी अपुरा होता. आणि या ठिकाणी सरपटणार्‍या प्राण्यांसाठी सोयी-सुविधा देखील पुरवणे अवघड जात होते. त्यामुळे प्रशासनाने या विभागाच्या स्थलांतराचा निर्णय घेतला. त्यानुसार प्राणिसंग्रहालयातीलच नव्या जागेत याचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

प्राण्यांना मिळणार नैसर्गिक अधिवास

सरपटणार्‍या प्राण्यांना जंगलात ज्याप्रमाणे अधिवास असतो, त्याप्रमाणेच अधिवास नव्याने उभारण्यात येणार्‍या इमारतीमध्ये या प्राण्यांसाठी करण्यात येणार आहे. यात मगर, सुसर यांचेसाठी दलदलीचा अधिवास असेल. कासव, सरडा यांचेसाठी त्यांना आवश्यक असा अधिवास येथे निर्माण केला जाईल. किंग कोब्रा, अजगर, धामण, तस्कर, मांजर्‍या साप, हरण टोळ, उडता सोनसर्प, घोणसाची विशिष्ट प्रजाती व जंगलातील प्रजाती वेगवेगळ्या आर्बोरियल विभागात ठेवण्यात येणार आहेत. तर मण्यार, नाग, घोणस, कवड्या साप, गवत्या यांना नैसर्गिक अधिवासात नवीन सुसज्ज इमारतीमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news