

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. पिकांच्या पेरणीनंतर आवश्यक असलेल्या खतांच्या सरासरी वापरापेक्षा सुमारे अडीच लाख टनांनी खताची अधिक उपलब्धता करण्यात येत आहे. शिवाय, गतवर्षीप्रमाणे खतांचे दर स्थिरच असून, यंदा खतांच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे कृषी आयुक्तालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील म्हणाले की, राज्यात यंदाच्या 2024-25 च्या खरीप हंगामात 48 लाख टन खतपुरवठ्याचे नियोजन प्रस्तावित आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला 45 लाख 53 हजार टन खतपुरवठ्याचे नियोजन मंजूर केले आहे. खतांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नसल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
राज्यात रासायनिक खतांचा वार्षिक वापर सरासरी सुमारे 65 लाख टन आहे. त्यापैकी खरीप हंगामात सरासरी 38 लाख टन, तर रब्बी हंगामात 27 लाख टन खत वापर होतो. गतवर्ष 2023-24 मध्ये खरिपात 44.56 लाख टन, तर रब्बीत 20.01 लाख टन मिळून एकूण 64.57 लाख टन रासायनिक खतांचा वापर झालेला आहे.
चालू वर्षाच्या मंजूर नियोजनानुसार खरिपात युरिया 13.73 लाख टन, डाय अमोनियम फॉस्फेट तथा डीएपी पाच लाख टन, म्युरेट ऑफ पोटॅश तथा एमओपी 1.30 लाख टन, संयुक्त खते 18 लाख टन, सिंगल सुपर फॉस्फेट तथा एसएसपी 7.50 लाख टन मिळून एकूण 45.53 लाख टन खतांचा समावेश आहे. त्यामध्ये चालू वर्षी सद्य:स्थितीत राज्यात 1 एप्रिलपासून आजअखेर 31.54 लाख टन खतसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून युरिया खत वगळता इतर खतांचे अनुदान निश्चित केले जाते. युरिया वगळता इतर खतांची विक्री किंमत ठरविण्याचे अधिकार खत कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. युरिया खताच्या विक्री किमती स्थिर असून, 45 किलो गोणीचा दर 266 रुपये 50 पैसे आहे. खतपुरवठादार कंपनीच्या उत्पादनस्थळानुसार युरियाचे अनुदान वेगवेगळे आहे. या खतांच्या किमती शेतकर्यांना परवडणार्या राहणार आहेत. शेतकर्यांना रासायनिक खतांचा वापर करताना मातीपरीक्षण अहवालानुसार संतुलित वापर करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकारने सन 2024-25 साठी (दि. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2024) प्रतिटन ग्रेडनिहाय अनुदानाचे दर घोषित करण्यात आलेले आहेत. निवडक खतांची विक्री किंमत 50 किलो प्रतिगोणी पुढीलप्रमाणे आहे. युरिया 266.50 रुपये, डीएपी 18ः46ः0ः0 -1350 रुपये, एमओपी 0ः0ः60ः0-1655-1700 रुपये, एनपी 24ः24ः0ः0- 1500-1700 रुपये, एनपीएस 24ः24ः0ः08-1600 रुपये, एनपीएस 20ः20ः0ः13- 1200 ते 1400 रुपये, एनपीके 19ः19ः19- 1650 रुपये, एनपीके 10ः26ः26ः0- 1470 रुपये, एसएसपी (जी) 0ः16ः0ः11- 530 ते 590 रुपये, एसएसपी (पी) 0ः16ः0ः12-490-550 रुपये.
खरिपात युरिया व डीएपी या दोन्ही खतांचा संरक्षित साठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार युरियाचा महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडे 1 लाख 5 हजार टन, नागपूरमधील विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे 15 हजार टन आणि मुंबईतील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे 30 हजार टन मिळून दीड लाख टन युरियाचा साठा संरक्षित करण्यात येत आहे. तसेच एमएआयडीसीकडे डीएपीचा 25 हजार टन खतसाठा संरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा