

शिवाजी शिंदे
पुणे: राज्यातील विविध भागांतील अडचणीत आणि अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांचे पुनर्वसन तसेच त्यांना साहाय्य करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘शक्ती सदन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे.
केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्ज्वला योजना ‘मिशन शक्ती’ या केंद्र पुरस्कृत ‘शक्ती सदन’ या उपक्रमात विलीन करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्यात महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ‘शक्ती सदन’ योजना राबविण्यात येत आहे. (Latest Pune News)
अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना त्यातून बाहेर काढणे, त्यांचे सक्षमीकरण करणे, तसेच त्यांना त्यांच्या आवडीचा व्यवसाय अगर नोकरीमध्ये सामावून घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
संस्थांना उपक्रमासाठी 5 वर्षांचा कालावधी
राज्य शासनाने निवडलेल्या स्वयंसेवी संस्थांना ‘शक्ती सदन’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संस्थांना उपक्रमासाठी पाच वर्षांचा कालावधी देण्यात आलेला आहे. पाच वर्षांनंतर या संस्थांची तपासणी करून मुदतवाढ द्यावयाचे की, कसे याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. संबधित स्वयंसेवी संस्थाना शक्ती युनिटची सक्षम पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.