Heavy Rain Red Alert | ठाणे, मुंबई, पुणे, कोल्‍हापूरला ‘रेड अलर्ट’; पुढील ४८ तास मुसळधारेचे

२४ तासांत सरासरी ९० ते २२० मि.मी.; महाबळेश्वरला सर्वाधिक २६६ मि.मी. नोंद
Heavy Rain Red Alert |
Heavy Rain Red Alert | ठाणे, मुंबई, पुणे, कोल्‍हापूरला ‘रेड अलर्ट’; पुढील ४८ तास मुसळधारेचे
Published on
Updated on

पुणे : गेल्या दोन दिवसांत मुंबई, कोकणात अतिवृष्टी, तर उर्वरित भागात मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू असून, पुढील ४८ तास असाच पाऊस सुरू राहणार आहे. प्रामुख्याने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे-सातारा घाटमाथा या भागांना हवामान विभागाने ४८ तास अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, मंगळवार (७ जुलै) नंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, पुन्हा आगामी ४८ तास मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज इन्सॅट थ्रीडी आर या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्राद्वारे हवामान विभागाने वर्तवला आहे.

असे आहेत अलर्ट (५ ते ६ जुलै)

रेड अलर्ट : पालघर (५, ६), ठाणे (५), मुंबई (५), रायगड (६), पुणे घाट (५, ६ ), सातारा (५ ). ऑरेंज अलर्ट : ठाणे (६), मुंबई (६), रायगड (७), रत्नागिरी (५, ६), नाशिक (६), पुणे घाट (६), सातारा (६).

पुढील ४८ तास या भागात जोर

कोकण विभाग : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : १०० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र : पुणे-सातारा घाट, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर : जोरदार पावसाची शक्यता. मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव : हलका ते मध्यम पाऊस. उत्तर महाराष्ट्र : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.

गेल्या २४ तासांत झालेला पाऊस

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २६६, राधानगरी १४५, लोणावळा १३६, गगनबावडा १३२, शिराळा ६९, वेल्हे ६५, शाहूवाडी ६४, आजरा, चंदगड, पेठ ५८, हातकणंगले ५३, वणी ५०, कोल्हापूर ४८, कागल, कसबे ४५, पन्हाळा ४४, रावेर, मुळशी ४२, खंडाळा, गगनबावडा ४१, कोयना १०५. लोणावळा ७५.

महाबळेश्वर जवळ नावलीत भूस्खलन; ३ कुटुंबांचे स्थलांतर

महाबळेश्‍वर : महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खचली. शेती व रस्‍त्‍यांना तडे गेले आहेत. मातीचा मलबा वाहून आल्‍याने तीन कुटुंबातील नागरिकांचे स्‍थलांतर करण्‍यात आले आहे. जमीन खचल्‍याने गावातील पाण्‍याच्‍या टाकीला धोका निर्माण झाला आहे. काही घरांना तडे गेले आहेत. महसूल विभागाच्‍या अधिकार्‍यांनी घटनास्‍थळाची पाहणी केली. दरम्‍यान, महाबळेश्‍वर तालुक्‍यात शुक्रवार सकाळपर्यंत तब्‍बल १० इंच पावसाची नोंद झाली. महाबळेश्‍वर तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्रभर धुवांधार तर शनिवारी दिवसभर संततधार सुरूच होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news