अधिकार्‍यांच्या बनावट सही, शिक्क्याने 47 कर्मचार्‍यांची भरती?

भरती केली नसल्याचा प्रशासनाचा दावा
pune municipal corporation
अधिकार्‍यांच्या बनावट सही, शिक्क्याने 47 कर्मचार्‍यांची भरती?File Photo
Published on
Updated on

पुणे: महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील कर्मचारी महापालिकेच्या सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी, लेटर हेड आणि शिक्के महापालिकेला सादर करण्यात आल्याचा आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, हे पत्र महापालिकेला मिळालेलेच नसल्याने संबधित कर्मचार्‍यांची भरती केली नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत 2021 मध्ये 23 गावांचा समावेश झाला आहे. या गावांमध्ये त्यावेळेस कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेने दिलेल्या ठरावानुसार महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याने अनेक बोगस कर्मचारी पालिकेच्या सेवेत घेण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जवळपास सहाशेहून अधिक कर्मचार्‍यांना सेवेत घेण्यात आलेले नाही. मात्र, समाविष्ट गावांमधील कर्मचारी भरतीमधील आणखी एक धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गत आठवड्यात तक्रार दाखल केली आहे.

नक्की काय आहे प्रकार?

समाविष्ट गावांमधील 47 कर्मचार्‍यांची यादी असलेले एक पत्र जिल्हा परिषदेकडून 14 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे महापालिकेला पाठविण्यात आले आहे. हे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. घुले यांच्या लेटर हेडवर असून, त्यांची स्वाक्षरी आणि शिक्का आहे. मात्र, जिल्हा परिषदेने दिलेल्या तक्रारीनुसार घुले हे 29 मे 2017 ते 9 ऑ क्टोबर 2021 या कालावधीत उपमुख्य कार्यकारी या पदावर होते.

त्यानंतर त्यांची सातारा जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी बदली झाली आहे. असे असताना ते पुणे जिल्हा परिषदेत पदावर कार्यरत नसताना त्यांच्या नावाचे बनावट लेटर हेड व बनावट स्वाक्षरी करून 47 कर्मचार्‍यांच्या भरतीचे पत्र पुणे महापालिकेला पाठविण्यात आले. हे पत्र, त्यावरील शिक्के आणि घुले यांची स्वाक्षरी बोगस असल्याचे खरात यांनी बंडगार्डन पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

...ते पत्र आम्हाला मिळालेले नाही!

समाविष्ट गावांतील 47 कर्मचार्‍यांचे भरतीचे जिल्हा परिषदेने पाठविलेले ते पत्र महापालिकेकडे आलेच नाही. त्याची नोंद पालिकेच्या आवकमध्ये झालेली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांची भरती झालेली नाही, असे महापालिकेच्या सेवकवर्ग विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news