मंचर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. मागील 24 तासांत श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे विक्रमी 324 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 65 मिलिमीटर पाऊस झाल्यावर शासनस्तरावर पीक नुकसानभरपाईसाठी अतिवृष्टी मानली जाते. येथे अतिवृष्टीच्या जवळपास पाचपट पाऊस झाल्याने शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे.
या पाण्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण पूर्णक्षमतेने भरले असून, धरणातून घोडनदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे धरणाखालील गावांमध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने ओढ्यानाल्यांना आलेले पाणी घोडनदीच्या पात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. (Latest Pune News)
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवार (दि. 19) ते बुधवारी (दि. 20) सकाळी 8 या 24 तासात अतिवृष्टी झाली. त्यात भीमाशंकर येथे 324 मिलिमीटर पाऊस पडला. तर, राजपूर 182, आंबेगाव 78, डिंभे धरण परिसर 99, असाणे 162, आहुपे 227, घोडेगाव 85, कळंब 42, मंचर 38, तसेच पारगाव-निरगुडसर येथे 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कुकडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांनी सांगितले.
काही दिवसांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोंढवळ धबधबा प्रचंड पाण्याने प्रवाहित झाला. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या धरणाच्या सांडव्यातून 15 हजार 910, वीजघर 550 असे एकूण घोडनदीत 16 हजार 360 क्युसेकने पाणी सोडले आहे. तसेच उजवा कालव्याला 100 क्युसेसने पाणी सोडले आहे.
- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता, पूर नियंत्रण कक्ष, कुकडी पाटबंधारे विभाग