

रावणगाव: अंधश्रद्धेच्या नावाखाली घरातील इडा पिडा थांबवतो त्याच बरोबर मुल होण्याचे औषध देण्याच्या नावाखाली दोन भामट्यांनी खडकी (ता. दौंड) परिसरातील काहींना गंडा घातला. या प्रकरणी दौंड पोलिसांत दोन महिन्यांपूर्वी फिर्याद दाखल होऊन पोलिसांना अद्याप हे आरोपी सापडलेले नाहीत.
खडकी गावात 14 डिसेंबर रोजी आलिशान मोटारीतून आलेल्या दोघांनी शेजार्यांची ओळख सांगून तुमच्या संसारात त्रास, घरातील किरकोळ वाद, यश येत नाही, प्रगती होत नाही, असे म्हणत एका गरीब कुटुंबाला विधी करावा लागेल.
देवघरातील सोन्याचे दागिने घेऊन, या असे सांगितले. त्यानंतर दागिने बाहेरील व्यक्तीच्या अंगावरून उतरल्यानंतर तुमच्या घराची प्रगती होईल, असे म्हणत रोख रक्कम व दागिन्यावर डल्ला मारला.
आपण सोलापूर जिल्ह्यातील असून, काही अडचण आल्यास आम्हाला मोबाईल नंबर वर कॉल करा, असे म्हणत त्यांनी दोन मोबाईल नंबर दिले. याच भामट्यांनी गावातीलच इतर चार ते पाच जणांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, घरातील काही लोकांना संशय आल्याने त्यांचा फसवणुकीचा प्रयत्न फसला. मात्र, एका कुटुंबाचे 13 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा 70 ते 75 हजार रुपयांचा ऐवज त्यांनी चलाखीने लंपास केला
गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल नंबर वरून आरोपीपर्यंत जाणे शक्य असताना तपासाच्या नावाखाली पोलिस उडवाउडवीची उत्तरे संबंधितांना देत आहेत. खडकी - रावणगाव परिसरात मागील काही दिवसांपासून अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर रात्री पोलिसांकडून पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.