रेडिरेकनर दरामध्ये पुण्यात 4.16; पिंपरी-चिंचवडमध्ये 6.69 टक्के वाढ

नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात 4.97 टक्के दरवाढ
Pune News
रेडिरेकनर दरामध्ये पुण्यात 4.16, पिंपरी-चिंचवडमध्ये 6.69 टक्के वाढFile Photo
Published on
Updated on

पुणे: तब्बल तीन वर्षांनंतर राज्यात रेडिरेकनरच्या दरात सरासरी 3.89 टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्वात अधिक वाढ सोलापूर महानगरपालिका हद्दीत 10.17 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी दिली. दरम्यान, पुण्यात सरासरी 4.16 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 6.69 टक्के दरवाढ झाली आहे. ही वाढ 1 एप्रिलपासून लागू होणार असून, यामुळे शासनाचा महसूल वाढणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात 3.36 टक्के, प्रभाव क्षेत्रात 3.29 टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात 4.97 टक्के, महानगरपालिका क्षेत्रात 5.95 टक्के (मुंबई वगळता) अशी रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली.

त्यामुळे राज्याची सरासरी वाढ 4.39 टक्के (मुंबई वगळता) पर्यंत झाली असून, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी वाढ 3.39 टक्के आणि संपूर्ण राज्याची एकूण वाढ 3.89 टक्के एवढी झाली आहे. राज्यात 2022 पासून रेडीरेकनरच्या दरात राज्य शासनाने कोणतीही वाढ केली नव्हती, असेही बिनवडे यांनी सांगितले.

हे दर वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नोंदणीकृत व्यवहारांची माहिती ‘एनआयसी’च्या माध्यमातून गावनिहाय व मूल्य विभागनिहाय संकलित करण्यात आली आहे. याशिवाय स्थावर व्यवसाय संकेतस्थळ व जागा पाहणी करून प्रत्यक्ष माहिती संकलित करून वाढ/घटीचा क्षेत्रनिहाय विचार करत हे दर प्रस्तावित केले आहेत.

सूचना, हरकतींनंतरच निर्णय

रेडीरेकनर दरवाढीचे तक्ते तयार करताना बांधकाम व्यावसायिक, दस्त लेखनिक यांची मुद्रांक जिल्हाधिकारीस्तरावर बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच, या प्रक्रियेतील लोकसहभाग गरजेचा आहे, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच्या बैठका घेण्यात आल्या.

या सर्व बैठकांमधून आलेल्या सूचना, हरकती विचारात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली आहे, असे नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी सांगितले. दरम्यान, 1 एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ केल्यानंतर पुढील आर्थिक वर्षापर्यंत म्हणजेच मार्च 2026 पर्यंत राज्याच्या तिजोरीत 75 हजार कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रभात-भांडारकर रस्त्यावर सर्वाधिक दर

पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता भागात रेडीरेकनरचा सर्वाधिक दर 86 हजार 710 रुपये प्रतिचौरस मीटर आहे. त्यापाठोपाठ गरवारे हायस्कूल, एसएनडीटी, कर्वे रस्ता या भागात 81 हजार 520 रुपये, ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्ता या भागात 77 हजार 950 रुपये, गोखले चौक, बाजीराव रस्ता परिसरात 77 हजार 220 रुपये चौरस मीटर रेडीरेकनर दर आहे

रेडिरेकनर 2025-26 सरासरी वाढ अशी (टक्के)

ग्रामीण क्षेत्र - 3.36

प्रभाव क्षेत्र - 3.29

नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र - 4.97

महापालिका क्षेत्र (मुंबई वगळता) - 5.95

राज्याची सरासरी वाढ (मुंबई वगळता) - 4.39

बृहन्मुंबई मनपा क्षेत्र सरासरी वाढ - 3.39

संपूर्ण राज्याची एकूण वाढ - 3.89

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news