

Sharad Sonawane controversy Ramoshi Protest
नारायणगाव : रामोशी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल रामोशी समाजाच्या बांधवांनी आळेफाटा(ता.जुन्नर) येथे आमदार शरद सोनवणे यांचा निषेध करत तीव्र आंदोलन केले.सोनवणे यांच्या प्रतिमेवर काळी शाई टाकून त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा यावेळी इशारा दिला.
जुन्नर तालुक्यातील रामोशी समाजाने आ. सोनवणे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला. आमदार सोनवणे यांनी रामोशी समाजाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध करताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सोनवणे यांचा निषेध केला. सोनवणे यांनी या ठिकाणी येऊन जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
दरम्यान आंदोलन सुरू असताना काही वेळाने आ. शरद सोनवणे आंदोलन स्थळी आले.आपण जुन्नर येथे केलेल्या वक्तव्याचा त्यांनी खेद व्यक्त करून रामोशी बांधवांची जाहीर माफी मागितली. सोनवणे यांनी जाहीर माफी मागितल्याने वातावरण निवळले. माझ्या बोलण्याने रामोशी समाजाच्या भावना दुखल्यावल्याने मी रामोशी बांधवांची जाहीर माफी मागतो असे यावेळी त्यांनी सांगितले.
जुन्नर येथे शुक्रवारी (दि. 25) सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. ही बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी सतर्क राहावे अशाही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले याबाबतची माहिती देताना आमदार सोनवणे म्हणाले की जुन्नर तालुक्यात होणाऱ्या चोऱ्या नगर भागातील रामोशी, फासेपारधी लोक करीत असतात असा उल्लेख केला.आमदार सोनवणे यांनी रामोशी व फासेपारधी लोकांबद्दल अपशब्द वापरल्याने महाराष्ट्र वर याचे तीव्र पडसाद उमटले.
यावेळी शंकर गोफणे, किरण मंडाले, सरपंच मुकुंद भंडलकर, आप्पासाहेब बोरुडे, नंदूशेठ चव्हाण, विपुल येलमर, गौरीताई शिरतर यांनी मनोगत व्यक्त करून आमदार सोनवणे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.या आंदोलनामध्ये बाळासाहेब शिरतर, धोंडीभाऊ भंडलकर, बबलू भंडलकर, साईनाथ शिरतर, सोनभाऊ भंडलकर, राहुल शिरतर, जितेंद्र भंडलकर, बाळासाहेब मस्कुले, नवनाथ शिरतर, गणेश गोफणे, रोहिदास बोरुडे, संदीप शितोळे, बाळासाहेब शितोळे, सोमेश्वर भंडलकर आदी सहभागी झाले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.