

पुणे: विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला भरभरून यश दिले. शिवसेनेचे 57 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडून आणले. त्यामुळे मातोश्रीवर आता खरी शिवसेना राहिलेली नाही. खरी शिवसेना आता ठाण्याच्या बाजूने असून, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असे स्पष्ट मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना स्वतःचे आमदार देखील सांभाळता आले नाहीत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. परंतु, मतदारांनी विरोधकांना डावलले.
खोटे बोलून आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत. केवळ टीका करणे आणि आरोप करणे, हे जनतेला पसंत पडले नाही. लाडकी बहीण योजनेचाही महायुतीला फायदा झाला. आमचा पक्ष भाजपचा पहिल्यापासून मित्रपक्ष राहिला आहे आणि पुढे देखील राहील असे देखील आठवले यावेळी म्हणाले.