

आळंदी : रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. पण जेव्हा हे नातं शतकांच्या सीमा ओलांडून, साक्षात ज्ञानियांच्या राजाला आणि त्यांच्या लाडक्या बहिणीला जोडतं, तेव्हा तो सोहळा केवळ उत्सव राहत नाही, तर एक जिवंत, स्पंदनशील अनुभूती बनतो. 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' म्हणत मोठ्या भावाला कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या मुक्ताईची माया आज पुन्हा एकदा अलंकापुरीत अवतरली. आदिशक्ती मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगरतर्फे पाठवलेली राखी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अर्पण करण्यात आली आणि इंद्रायणीच्या तीरावर जणू तोच जुना, जिव्हाळ्याचा क्षण पुन्हा जिवंत झाला.
पहाटेच्या मंगलमय वातावरणात, माऊलींची नित्य पूजा आणि पवमान अभिषेक संपन्न झाल्यानंतर अवघी अलंकापुरी एका ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होती. आदिशक्ती मुक्ताई संस्थानच्या विश्वस्तांनी मोठ्या श्रद्धेने आणलेली 'मुक्ताईची राखी' माऊलींच्या समाधीवर अर्पण केली. बहीण-भावाच्या या गोड नात्याची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने जपण्यात आली.
या सोहळ्याने अवघी अलंकापुरी भारावून गेली होती. इंद्रायणीचा शांत प्रवाह, सिद्धेश्वराच्या मंदिराचा कळस, आणि माऊलींच्या देऊळवाड्यातील प्रत्येक चिरा जणू या अद्वितीय प्रेमाचा साक्षीदार बनला होता.
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।१।।
उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।।धृ।।
माया समुळ नुरे जेव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेव्हा ।।३।।
ऎसा उमज आदि अंती । मग सुखी व्हावे संती ।।४।।
काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।
तत्कालीन सामाजिक त्रासाला कंटाळून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज निराश होऊन झोपडीचे दार बंद करून बसले होते, तेव्हा त्यांची लहानगी बहीण मुक्ताईच त्यांच्या मदतीला धावून आली. तिने केवळ दार उघडायला सांगितले नाही, तर ज्ञानाचा दिवा पुन्हा प्रज्वलित करून जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवला. याच अतूट नात्याचे प्रतीक म्हणून, आदिशक्ती मुक्ताई संस्थान दरवर्षी न चुकता आपल्या लाडक्या भावासाठी, ज्ञानदेवासाठी राखी पाठवते. ही केवळ एक राखी नाही, तर बहिणीने भावाला दिलेल्या धैर्याची, प्रेमाची आणि कर्तव्याच्या जाणिवेची आठवण आहे.
या हृदयस्पर्शी क्षणी, माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यासाठी श्री संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, सम्राट पाटील, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले, विचारसागर महाराज लाहुडकर, मुक्ताई पालखी सोहळा अश्व मानकरी संदीप महाराज भुसे, प्रतिभा पाटील, मीनाताई पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानदेवांप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका महाराज यांनाही राख्या पाठविण्यात आल्या.