

खेड: राजगुरुनगर सहकारी बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्तुंग कामगिरी नोंदवत विक्रमी २५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या आर्थिक वर्षात तब्बल ४०५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत बँकेने जिल्ह्यातल्या ४७ - ४८ नागरी सहकारी बँकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी शनिवारी ( दि ५) बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली. राजगुरुनगर सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांना आणि कर्जधारकांना अनेक नावीन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना दिलेले आश्वासन पूर्ती म्हणुन कर्जधारकांना पुर्वीच्या दोन लाखांऐवजी या आर्थिक वर्षापासून कर्जदार सभासदांना ऐच्छिक स्वरूपात ४ लाखांचा अपघाती विमा दिला आहे . विविध प्रकारच्या ४०० व्यवसायांना २५ ते ३५ टक्के अनुदानित कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय, मोबाईल बँकिंग, एटीएम आणि इतर डिजिटल बँकिंग सेवांच्या वापरातही बँकेने आघाडी घेतली आहे असेही अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितले.
बँकेची ही प्रगती म्हणजे ग्राहकांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फलित आहे. झपाट्याने विकसित होत असलेली ही बँक विश्वासार्हतेच्या नव्या राजमार्गावरून यशस्वी वाटचाल करत आहे. भविष्यातही ग्राहककेंद्रित सेवा आणि नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचा बँकेचा मानस आहे असेही ओसवाल यांनी सांगितले.
अयोध्येत श्रीराम मंदिर पुर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.त्या प्रित्यर्थ बँकेत नव्याने ' श्रीराम आवर्त ठेव ' योजना सुरू केली. या पार्श्वभूमीवर बँकेत नव्याने ४ हजार ५०० खाती उघडण्यात आली. असे ओसवाल यांनी सांगितले. उपाध्यक्ष अविनाश कहाणे, माजी अध्यक्ष, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, राजेंद्र वाळुंज,दत्ता भेगडे, विजया शिंदे, सागर पाटोळे, विजय डोळस , अश्विनी पाचारणे,रामदास धनवटे, विनायक घुमटकर, गौतम कोतवाल, समीर आहेर, सचिन मांजरे, मुख्याधिकारी शांताराम वाकचौरे, अधिकारी संजय ससाणे, अमृत टाकळकर व इतर यावेळी उपस्थित होते. उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
बँकेचा एकूण व्यवसाय २९०० कोटी इतका झाला आहे. ग्रॉस एनपीए ६.२७ टक्के आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ७०० कोटी रुपयांनी व्यवसाय वाढ झाली. तसेच ग्रॉस N.P.A १५.५ टक्के ने कमी होऊन ६.२७ टक्का झाला. खेड तालुक्यातील चाकण एम आय डी सी फोफावत असलेल्या भागातील भांबोली शाखेचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे .
दिनेश ओसवाल , अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक