पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पदाधिकार्यांशी चर्चा करून आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (दि.3) पुणे दौर्यावर आले होते. ठरलेल्या वेळेत शहरातील पदाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे नाराज झालेले राज ठाकरे मुंबईला परत गेले. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील मनसेमधील नाराजीनाट्य समोर आले आहे.
नवी पेठेतील पक्ष कार्यालयात रविवारी (दि.3) दुपारी दोन वाजता बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते वेळेवर आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे संतापले. राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार हे माहीत असूनही पदाधिकारी आले नाहीत. उशिरापर्यंतही पदाधिकारी, नेते आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा पक्ष कार्यालय परिसरात सुरू होती.
पदाधिकार्यांची बैठक सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, नंतर या बैठकीची वेळ बदलून दोन वाजता करण्यात आली. दोन ते सव्वादोन वाजता पदाधिकार्यांना आणि विभागप्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलावले होते. राज ठाकरेदेखील सव्वादोन वाजता पक्ष कार्यालयात पोहोचले. मात्र, या शहरातील कार्यालयात मुख्य पदाधिकारी नव्हते. ज्यांना बैठकीला बोलावण्यात आले होते, ते विभागप्रमुखही पोहोचले नव्हते. सर्वांना फोन करण्यात आला. परंतु, पदाधिकारी पोहोचेपर्यंत राज ठाकरे ताटकळत बसले होते. त्यानंतर काहीजण आले, मात्र राज ठाकरे काही न बोलता निघून गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
हेही वाचा