यंदा तब्बल 5 महिने पावसाने दैना उडवत सरासरीच्या दुप्पट पाऊस भिगवण (ता. इंदापूर) परिसरात बरसला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असले तरी खरिपाच्या पिकांना याचा फटका तर बसला शिवाय रब्बी हंगामालाही धोका वाढला आहे. निसर्गाचा हा लहरीपणा बळीराजाला हवालदिल करणारा ठरत आहे.
गेल्या वर्षी सरासरी गाठता आली नसल्याने दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. यावर्षी परिस्थिती उलटी झाली आहे. अगदी अवकाळीनेच 79.90 मिलिमीटर पावसाने जोरदार सलामी दिली.
त्यानंतर मोसमीचा जून महिन्यात 281.10 मिलिमीटर असा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. पुढे जुलैमध्ये 79.50 मिलिमीटर, ऑगस्टमध्ये 133.40 मिलीमीटर, सप्टेंबरमध्ये 193.50 मिलिमीटर आणि चालू ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 80.40 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. या एकूण 5 महिन्यांत 840.20 मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे.
हा दमदार पाऊस खरीप हंगामातील उडीद, मका, सोयाबीन, कांदा तसेच भाजीपाला पिकांना नुकसानकारक ठरला आहे. तर रब्बीसाठी लागवड केलेल्या ऊस पिकाच्या उगवणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. अगदी ओल्या दुष्काळाचे सावटही जाणवू लागले आहे.
येथील अन्नधान्य बाजारात रविवारी (दि. 20) व्यापार्यांनी खरेदी केलेली मका व धान्यही उघड्यावर होते. सोमवारी (दि. 21) अचानक आलेल्या धुव्वाधार पावसाने हे धान्य भिजून काही प्रमाणात नुकसान झाले. तर दुसरीकडे येथील शेतीला वरदान ठरलेला मदनवाडी तलाव तिसर्यांदा ओसंडून वाहू लागला आहे. या भागातील लहान-मोठे ओढे नाले प्रवाहित झाले आहेत. शेतात पाणीच पाणी दिसत आहे. तर विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.