

बारामती: प्रस्तावित बारामती-फलटण रेल्वेमार्गासाठी अवघे 23 हेक्टर क्षेत्र संपादित करणे बाकी आहे. येत्या 3 महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे या वेळी उपस्थित होते. नावडकर यांनी या वेळी रेल्वे, पालखी महामार्ग व उंडवडी ते सांगवी या रस्त्याच्या भूसंपादनाविषयी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, बारामती-फलटण रेल्वेमार्गासाठी 191 हेक्टरपैकी 168 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. 23 हेक्टर संपादन बाकी असून, त्यातील 10.66 हेक्टरचे संपादन दीड महिन्यात, तर उर्वरित संपादन मोजणीनंतर पुढील 3 महिन्यांत केले जाईल. भूसंपादनाच्या नोंदी सातबारा सदरी घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेमार्गाच्या भूसंपादनापोटी 281.43 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील 261.30 कोटींचे वितरण करण्यात आले असून, 20 कोटी रुपये शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. पालखी महामार्गासाठी 343 हेक्टरपैकी 338 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. 4.89 हेक्टर भूसंपादन बाकी आहे. ते महिनाभरात पूर्ण होईल.
यासंबंधी 205 निवाडे झाले आहेत. 121 निवाड्यांची अंमलबजावणीही केली गेली आहे. पालखी महामार्ग भूसंपादनापोटी 1265 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यातील 1232 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, 33 कोटी रुपये शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. या कामी एकूण 1401 कोटींची बक्षिसपत्रे झाल्याचे त्यांनी सांगितले.
उंडवडी ते सांगवी या महामार्गाचे उंडवडी ते बारामती व बारामती ते सांगवी, असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यासाठी 104 कोटींची बक्षिसपत्रे झाली आहेत. या रस्त्यासाठी यापूर्वी काही ठिकाणी जमिनी संपादित झाल्या होत्या. त्यात जमिनींचे पैसे मिळाले होते. परंतु, वास्तूंचे मूल्यांकन करत रक्कम देणे बाकी होते.
ते काम सध्या केले जात आहे. काही जमिनी संपादित झाल्या होत्या. पण, त्या कागदोपत्री दिसत नव्हत्या, त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पाहुणेवाडी गावात व सांगवी गावठाणात भूसंपादनाबाबत काही अडचणी आहेत. परंतु, त्यातून मार्ग काढू, असे नावडकर यांनी स्पष्ट केले.