

Political Leader Rahul Kool Latest News:
रामदास डोंबे
खोर: पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे आ. राहुल कुल. दौंडचे आमदार असलेले कुल सध्या भाजपचे ‘किंगमेकर’ ही भूमिका बजावत असून, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या डावपेचांमुळे विरोधी पक्षांची चांगलीच धांदल उडालेली दिसते.
राहुल कुल यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी उत्तम वैयक्तिक संबंध आहेत. या संपर्काचा भाजपने अनेकवेळा राजकीय फायद्यासाठी वापर केला आहे. विधानसभेनंतर आता भाजपचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकांकडे वळले असून, ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढविण्याचे मिशन कुल यांच्यावर सोपविण्यात आले आहे. (Latest Pune News)
आजपर्यंत पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी असो, राहुल कुल यांनी ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे. पक्षांतर्गत आणि विरोधकांमध्ये टक्कर देणार्या नेत्यानुसार त्यांचा लौकिक भाजपमध्ये वेगळाच आहे. माजी आमदारांच्या प्रवेशामागे राहुल कुल यांचा निर्णायक हात आहे.
यामध्ये संग्राम थोपटे (भोर), कुणाल पाटील (धुळे) आणि प्रवीण माने (जि. प. माजी सभापती) यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. या तीनही जणांच्या पक्षप्रवेशामागे राहुल कुल यांनी घेतलेली मेहनत आणि भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, दौंडचे आमदार कुल यांनी त्यांच्या प्रभावात खळबळ माजवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुल हे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी घराण्याशी निष्ठावान असलेले काँग्रेसमधील अनेक माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, हे सर्व राहुल कुल यांच्या रणनीतीमुळे शक्य होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे मोठे राजकीय संकट ठरत आहे.
पुणे जिल्ह्यात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहुल कुल यांच्या नेतृत्वामुळे भाजपला मोठा फायदा होईल, हे स्पष्ट दिसू लागले आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेससारख्या पक्षांचा प्रभाव कमी करीत भाजपला मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आ. राहुल कुल हे केंद्रस्थानी आले आहेत. सध्या त्यांच्या हातात असलेली राजकीय सूत्रे पाहता, ते पुण्यात भाजपसाठी ”गेमचेंजर” ठरणार, याबाबत शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळतोय
पुणे जिल्हा हा अजित पवार यांचे प्रभावशाली क्षेत्र मानले जाते. मात्र, सध्या राहुल कुल यांचे काम पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर स्पष्ट परिणाम होताना दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत विश्वासू सहकारी मानले जात आहेत.