

पुरंदर विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे विमानतळ होणार की नाही, यावरून अनेकदा चर्चा झाली असली; तरी आता हा प्रश्न मार्गी लागणार आहे. हे विमानतळ जुन्याच जागेवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दै. पुढारीसोबत बोलताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या वेळी ते म्हणाले, पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ मूळ जागेवरच होणार असून, त्याला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची मान्यता आहे. येत्या काही दिवसांतच याविषयी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यासह सर्व यंत्रणांची बैठक होणार आहे. याविषयी एकत्रितपणे जागेची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पुरंदर विमानतळा संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने 2018 मध्ये पाठविला होता. पुरंदर विमानतळासाठी जुनी जागा महायुती सरकारच्या काळात ठरविण्यात आली होती. त्या वेळी विमानतळाचा प्रस्ताव मंजूरही झाला होता. मात्र, 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारने जागा बदलली. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हा प्रस्ताव रखडल्याचे मोहोळ यांनी सांगितले. त्यानंतर महायुती सरकारने 2023 मध्ये पुन्हा मूळ जागेचा प्रस्ताव पाठविला. आता या प्रस्तावानुसार मूळ जागीच विमानतळ उभारण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मंजुरी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.