शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी बस-सायकलने प्रवास करू- पुणेकर

शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी बस-सायकलने प्रवास करू- पुणेकर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरात वाढलेले प्रदूषण कमी करण्यास आम्ही तयार असून, बस, सायकलचा वापर करू; पण वाहनातून निघणार्‍या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण कमी झाले पाहिजे, असे मत शहरातील 69 टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील 'परिसर' या संस्थेने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. जानेवारी महिन्यात जंगली महाराज रोड येथे जनजागृतीसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम फुप्फुस प्रतिकृती फलकाच्या उपक्रमादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. फलकाच्या ठिकाणी भेट दिलेल्या एकूण 701 पुणेकरांकडून सजेशन कार्डच्या माध्यमातून ही माहिती घेण्यात आली.

शहरातील हवा आरोग्यदायी राहावी म्हणून पुणेकरांनी रस्त्याने चालायची, सायकल चालवायची तसेच सार्वजनिक बसने प्रवास करायची देखील तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी पुणे महानगरपालिकेने सध्याच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत, सायकल आणि पादचार्‍यांसाठी सुविधा आणि पायाभूत व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक वाहतूक बळकट करावी

सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, पुण्यातील हवाप्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेत सुधारणा करून ती विश्वसनीय, आरामदायी आणि किफायतशीर करण्याची गरज असल्याचे 39 टक्के नागरिकांना वाटते. तसेच, पादचार्‍यांसाठी आणि सायकल चालविण्यासाठी सुरक्षित आणि चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या, तर पुण्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असे 30 टक्के नागरिकांचे मत आहे. या दोन्ही मागण्यांची एकूण टक्केवारी 69 इतकी होते.

50 टक्के लोकांनी सायकल वापरली, तर प्रदूषण 30 टक्के कमी होईल

आयआयटीएम पुणेच्या सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी वेदरफोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्चचे (सफर) संस्थापक संचालक गुरफान बेग म्हणाले की, हे सर्वेक्षण शहर नियोजनकारांसाठी रिमाईंडर असून, सार्वजनिक तसेच यंत्रविरहित वाहतूक सुविधांची मागणी करण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे, असे हे सर्वेक्षण सूचित करते. सध्या पुणे शहरात खासगी वाहनांचा वापर करणार्‍यांपैकी 50 टक्के नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर सुरू केला, तर पीएम 2.5 या अतिसुक्ष्म धूलिकणांमुळे होणार्‍या प्रदूषणात 20 ते 30 टक्के घट होईल. या सर्वेक्षणाची प्रत शिफारशींसह परिसर संस्थेने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना सादर केली आहे, शिवाय लोकप्रतिनिधींनादेखील देण्यात येणार आहे.

सायकल योजना मागे पडली

पुण्याच्या स्वच्छ हवा कृती आराखड्यात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गतिशीलतेसंदर्भात अनेक उपाययोजना मांडल्या आहेत. मात्र, त्या एकसंध नाहीत किंवा त्यांची अंमलबजावणीच झालेली नाही, असे परिसरच्या शर्मिला देव यांनी नमूद केले. या कृती आराखड्यात पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये विजेवरील बसगाड्यांचा समावेश आणि जुन्या बसगाड्या टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे म्हटले आहे. मात्र, संपूर्ण सार्वजनिक बससेवेत सुधारणा कशी करावी, याबाबत कसलाही उल्लेख नाही. इतकेच नव्हे, तर 2016 मध्ये तयार केलेली पुणे सायकल योजनादेखील अंमलबजावणीच्या बाबतीत मागे पडली आहे.

31 टक्के नागरिक म्हणतात कचरा जाळू नका

कचरा जाळण्यामुळे हवेची गुणवत्ता गंभीरपणे खालावते म्हणून कचर्‍याचे वर्गीकरण आणि त्याचा शहरातच पुनर्वापर करण्याचे व्यवस्थापन पुणे महानगरपालिकेकडून खात्रीशीरपणे व्हावे, असे मत 31 टक्के नागरिकांनी मांडले.

नागरिकांचा संकल्प
सायकल चालवू : 59 टक्के
प्लास्टिकचा वापर टाळू : 25 टक्के
कचर्‍याचे वर्गीकरण करू : 16 टक्के

सर्वेक्षणाच्या विश्लेषणानुसार, हवा प्रदूषणात घट करण्यासाठी वाहतुकीशी संबंधित उपक्रमांना सर्वाधिक गरजेची बाब म्हणून नागरिकांनी सर्वोच्च प्राधान्य दर्शविले आहे. चालणे, सायकलचा वापर आणि सार्वजनिक बसने प्रवास करण्याची नागरिकांची तयारी असणे हे आमच्या सर्वेक्षणातून सूचकपणे दिसून येते, मात्र संबंधित पायाभूत सुविधा या सक्षम, विश्वसनीय आणि लोकांना अनुकूल असणे अपेक्षित आहे. सध्याच्या स्थितीतदेखील दिवसाकाठी सरासरी दहा लाख प्रवासी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसने प्रवास करतात.
– श्वेता वेर्णेकर, परिसर संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news