

Pune ZP students in merit list
पुणे: राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षीच्या राज्य गुणवत्ता यादीत एकूण 68 विद्यार्थ्यांची नावे झळकली असून, त्यापैकी तब्बल 47 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत.
गेल्या 25 वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत आघाडीवर होता. मात्र, सलग दुसर्या वर्षी पुणे जिल्ह्याने ही परंपरा खंडित करत राज्यात यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत एकूण 1,203 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 710 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतील आहेत. या आकडेवारीवरून जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेत किती प्रभावी कामगिरी केली आहे, हे स्पष्ट होते. (Latest Pune News)
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी वर्गातच करून घेतली जाते. इयत्ता चौथी व सातवीमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे, फेब—ुवारी महिन्यात शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाते. तज्ज्ञ शिक्षकांमार्फत ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. या नियोजनबद्ध तयारीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या यशामध्ये स्पष्टपणे दिसून येतो.
गुणवत्ता यादीतील विभागवार आकडेवारी
ग्रामीण भागातील विद्यार्थी : 37 (एकूण 104 पैकी)
शहरी भागातील विद्यार्थी :19 (एकूण 106 पैकी)
बोर्ड विद्यार्थी : 12 (एकूण 51 पैकी)
गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळांतील 75 ते 80 टक्के विद्यार्थी झळकले आहेत. शिक्षक कार्यशाळा, सराव परीक्षा, तसेच ऑनलाईन मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषद शाळांचे यश सातत्याने वाढत आहे. ही बाब इतर जिल्ह्यांसाठी आदर्श निर्माण करणारी आहे.
- संजय नाईकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे