

लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध भाजे धबधब्यावरून विसापूर किल्ल्याकडे जाणाऱ्या धोकादायक आडवाटेवर पाय घसरून दरीत कोसळल्याने एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अब्राहम शिंसे (वय २९, रा. विमाननगर, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अब्राहम हा मूळचा पाटण्याचा रहिवासी असून, तो पुण्यामध्ये 'फादर'चे शिक्षण घेत होता. आज तो आपल्या मित्रांच्या समूहासोबत वर्षाविहारासाठी भाजे लेणी आणि विसापूर किल्ला परिसरात आला होता. भाजे धबधब्यापासून किल्ल्याकडे जाणाऱ्या एका धोकादायक आणि निसरड्या आडवाटेने जात असताना जंगल भागात त्याचा तोल गेला आणि तो थेट दरीत डोक्यावर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे ठिकाण अत्यंत धोकादायक आणि निसरडे असल्याने बचावकार्य आव्हानात्मक होते. मात्र, पथकातील जवानांनी अथक प्रयत्न करून अब्राहमचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. या बचावकार्यात सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश म्हसणे, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ आणि अशोक उंबरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्थानिक प्रशासन आणि नागरिक पर्यटकांना वारंवार धोकादायक ठिकाणी न जाण्याच्या सूचना देत असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात डोंगररांगा निसरड्या झालेल्या असताना अशा धोकादायक वाटा निवडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निसर्गाचा आनंद घेताना पर्यटकांनी नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने दाखवून दिले आहे.