Pune Water Supply: मुठा कालव्यातून दररोज सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग

जलसंपदा विभागच देत नाही पिण्याच्‍या पाण्याला प्राधान्‍य; विसर्ग बंद करणे पुणेकरांसाठी महत्त्वाचे
Pune Water Supply
Pune Water SupplyPudhari
Published on
Updated on

पुणे: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत झालेला अपुरा पाऊस, एल निनोचे असलेले संकट आणि शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाणीसाठा यामुळे सध्या शहरात पाणीकपात (२२ जुलैपर्यंत स्थगित) सुरू आहे. असे असले तरी जलसंपदा विभाग मात्र, नवीन उजव्या मुठा कालव्यातून दररोज ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करत आहे.

एकीकडे पाणी कमी असताना कपातीचा सल्ला देणारा जलसंपदा विभागच हा विसर्ग करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य न देता गेल्या आठ दिवसांपासून कालव्यातून सोडून देत आहे. हे पाणी शहराला रोज लागते त्याच्या दीडपट असून पाणीकपातीवर भर देण्यापेक्षा कालव्यातील विसर्ग बंद करणे हे पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune Water Supply
Sugar Price Hike: साखरेच्या दराला तेजीची उसळी; क्विंटलला ४६०० ते ४६५० रुपये दर

यंदा पावसाळ्यात कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जानेवारीतच दिला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने एप्रिलमध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यात 15 टक्के पाणीकपात करावी, असा सल्ला महापालिकेला दिला होता. त्या वेळी चारही धरणांमध्ये मिळून एकूण साठा 45 टक्के अर्थात 13.20 टीएमसी होता.

मात्र, महापालिकेने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यावरून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महापालिकेने पाणीकपात करायला हवी, असे सांगून 15 ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर महापालिकेने 15 जूनपासून शहरात एक दिवसा आड पाणीकपात सुरू केली. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. उशिराने दाखल झालेल्या पावसाने जूनमध्ये हजेरी लावली नाही. मात्र, त्यानंतर 1 जुलैपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याचा साठा सुरू झाला.

Pune Water Supply
Pune Cyber Investigation: आयुक्तांना आलेला वादग्रस्त मेसेज 'फेक'च? सायबर चौकशीची मागणी

तर, 7 जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण भरल्याने सुरुवातीला उजव्या मुठा कालव्यातून 500 क्युसेकने, तर त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने 8 जुलैला दिवसभर सर्वाधिक 27 हजार 203 क्युसेकने विसर्ग सुरू राहिला. त्याच वेळी कालव्यातूनही 700 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. पाऊस थांबल्यानंतर 9 जुलैला मुठा नदीतील विसर्ग बंद करण्यात आला.

खडकवासला धरण साखळीत 9 जुलैला 16 टीएमसी अर्थात सुमारे 55 टक्के पाणीसाठा होता. मात्र, जलसंपदा विभागाने 7 आणि 8 जुलैचा पावसाचा अपवाद वगळता 9 जुलैपासून कालव्याद्वारे सुरू असलेला 700 क्युसेकचा विसर्ग कायम ठेवला आहे. पाऊस थांबल्यानंतर सांडव्यातील विसर्ग बंद करणार्‍या जलसंपदा विभागाने कालव्यातील विसर्ग का बंद केला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वारीसाठी दर वर्षी पाव ते अर्धा टीएमसी पाणी सोडले जाते. मात्र, हे पाणी वारी पुण्यातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर सोडले जाते. यंदा वारी 9 जुलैला पुण्यात मुक्कामी होती. त्यानंतर हे पाणी सोडणे अपेक्षित होते. त्यातही हा विसर्ग 700 क्युसेकने होत आहे. त्यामुळे आतापर्यंत किमान पाऊण टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

पालखी सोहळाही शुक्रवारी पुण्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्यांनाही आता सोडलेल्या पाण्याचा उपयोग होणार नाही. तसेच, खडकवासला धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनाही सध्या या पाण्याचा फारसा वापर करता येणार नाही.

पालखी शहरात असताना पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 13 जुलैला पुन्हा पाणीकपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, महापौरांच्या हस्तक्षेपानंतर तो 22 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, पुरेसा पाऊस न पडल्यास पाणीकपातीचे संकट कायम राहणार आहे. अशातच कालव्यातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कालव्यातून विसर्ग अजूनही सुरू आहे. हे पाणी शेतीसाठी सोडण्यात आलेले नाही. मात्र, शुक्रवारी (दि. १७) याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल.

- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

पाणीकपात तूर्तास स्थगित असली तरी ती पुढे लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळी कालव्यातून विसर्ग का सुरू ठेवला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असताना हा विसर्ग बंद करायला हवा.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news