

पुणे: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा पावसाळा उशिरा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिकांनी पाणी नियोजन काटेकोरपणे करावे, असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व नियोजन बैठकीत 31 मेपर्यंत शहरातील पाणीकपात करू नये, असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर पावसाची परिस्थिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगत पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विद्यमान पाणीसाठा, जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरणप्रणाली आणि संभाव्य टंचाईला सामोरे जाण्यासाठीच्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.
शहराला खडकवासला प्रकल्पांतर्गत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणांतील साठा समाधानकारक असला तरी, भारतीय हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या धरणांमध्ये 32.80 टक्के म्हणजेच 10.13 टीएमसी साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती समाधानकारक असल्याने तूर्तास कपातीची गरज नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
31 ऑगस्टपर्यंतचे सूक्ष्म नियोजन
हवामान विभागाने यंदा 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे, मात्र पाऊस जुलै महिन्यानंतरच अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन 31 ऑगस्टपर्यंत शहराला पाणी पुरेल असे नियोजन महापालिका करीत आहे. 31 मे रोजी पुन्हा एकदा हवामान विभागाचा अंदाज आणि धरणातील साठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
‘नो रनिंग टॅप्स’ आणि वॉटर मीटर
पाणीकपात टाळण्यासाठी महापौरांनी पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः घरगुती कामांसाठी नळ चालू ठेवून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ‘नो रनिंग टॅप्स’ हे धोरण राबविण्याचे त्यांनी सुचविले आहे. तसेच, शहरातील पाणीगळती आणि वापराचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘वॉटर मीटर रीडिंग’ सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याचे कोणतेही बिल आकारले जाणार नाही. मात्र, पाण्याचा अपव्यय कुठे होतोय, हे यातून स्पष्ट होईल.
पाणीसाठ्याची आकडेवारी
सध्या धरणांमध्ये 32.80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
शहराला दररोज 1,560 एमएलडी पाणीपुरवठा.
शहराची दरमहा दीड टीएमसी पाण्याची गरज.
दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास महिन्याला 0.5 एटीएमसी पाणीबचत.
खडकवासला धरणसाखळीत 10 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात 32.80 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता पाणीसाठा पुरेसा असून, सध्यातरी पाणीकपात करण्याची आवश्यकता नाही. यंदा पाऊस 92 टक्के सरासरी पडणार असून, उशिरा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करायचे असल्यामुळे 31 मेनंतर पाण्याचा साठा लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका