

पुणे : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथयात्रेचा समारोप महाराष्ट्र दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे विजयकुमार ठुबे आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा सरचिटणीस सिध्दार्थ कोंढाळकर, शहर उपाध्यक्ष जोतिबा नरवडे आणि जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद उपस्थित होते. यावेळी बोलताना ठुबे म्हणाले, या रथयात्रेची सुरुवात दि. 18 मार्च रोजी वेरुळ येथून झालेली आहे. दि. 30 एप्रिल रोजी पौड येथे या रथयात्रेचे आगमन होणार असून तेथे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी पिंपरी येथे रथाचा मुक्काम राहणार आहे. दि. 1 मे रोजी सकाळी 9 वाजता दापोडी येथून रथयात्रेला सुरुवात होणार आहे. विमाननगर चौक मार्गे चंदननगर, हडपसर, आझम कॅम्पस, स्वारगेट मार्गे सायंकाळी 5 वाजता लाल महाल येथे पोहोचणार आहे. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही रथयास्त्रा शिवाजीनगर गावठाण येथील छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ येथे जाणार असल्याचे ठुबे यांनी यावेळी सांगितले.
या रथयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ येथे होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष विजय घोगरे, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, जिजाऊ रथयात्रा प्रमुख सौरभ खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर, माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, शाहीर संभाजी भगत, महासचिव चंद्रशेखर शिखरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढरे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांसह विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे घाडगे यांनी यावेळी सांगितले.