Pune Theatre Canteen Issue: महापालिकेच्‍या फक्त दोनच नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन; १४ नाट्यगृहांत चहा, कॉफी, नाष्ट्याची व्यवस्थाच नाही

कलाकार, तंत्रज्ञांसह रसिकांची गैरसोय; सर्व नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्याची मागणी
Drama
DramaPudhari
Published on
Updated on

पुणे: नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी, मध्यंतरात किंवा कार्यक्रम संपल्यानंतर हातात गरमागरम चहा-कॉफीचा घोट घेत नाटकावर गप्पा मारणे, कलाकारांच्या अभिनयावर चर्चा करणे, पुढील अंकाची उत्सुकतेने वाट पाहणे, ही पुण्याच्या नाट्यसंस्कृतीची अनेक वर्षांची परंपरा. मात्र, पुणे महापालिकेच्या बहुतांश नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनच नसल्याने रसिकांची हीच 'चहा-कॉफीची वेळ' अक्षरशः हुकत आहे.

मध्यंतरातील अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत चहा किंवा नाष्ट्यासाठी नाट्यगृहाबाहेर धावपळ करावी लागत असून, अनेकदा मध्यंतर संपण्यापूर्वीच सभागृहात परतण्यासाठी कसरत करावी लागते. नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन नसल्याने कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांमध्ये नाराजी असून, सर्व नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Drama
Pune HCMTR Project: एचसीएमटीआरमुळे प्रवासाचा वाढणार वेग; पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा

महापालिकेच्या शहर आणि उपनगरात १६ नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्र आहेत. यापैकी सध्या केवळ बालगंधर्व रंगमंदिर (जंगली महाराज रस्ता) आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) या दोन नाट्यगृहांमध्येच कॅन्टीन आहे. उर्वरित १४ नाट्यगृहांमध्ये चहा, कॉफी किंवा नाष्ट्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, मध्यंतरात किंवा कार्यक्रमानंतरही कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांना नाट्यगृहाबाहेर जावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (पुणे-सातारा रस्ता), विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर), पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रस्ता), गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट) या ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या मोठी आहे. पण, येथेही कॅन्टीनची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे दोन ते तीन तास चालणाऱ्या नाट्यप्रयोगांमध्ये मध्यंतरासाठी अवघा दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ मिळतो.

Drama
Baramati crime case: बायकोकडूनच दृश्यम स्टाईल खुनाचा प्रयत्न! घरात कट्टा बांधत पतीला गाडण्याचा प्लॅन फसला

या कालावधीत बाहेर जाऊन चहा-नाष्टा करून पुन्हा वेळेत सभागृहात परतणे अनेकांना शक्य होत नाही. तर, दुसरीकडे अनेक नाट्यप्रयोग रात्री उशिरा संपत असल्याने बाहेरही चहा किंवा नाष्टा सहज उपलब्ध होत नाही. उपनगरातील नाट्यगृहांतही कॅन्टीनची सुविधा नाही. त्यामुळेच सर्व प्रमुख नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्याची मागणी कलाकार, नाट्यसंस्था आणि रसिकांकडून केली जात आहे.

नाट्यरसिक सुरेश गायकवाड म्हणाले, "चहा किंवा कॉफीसाठी बाहेर जावे लागते आणि मध्यंतर संपण्यापूर्वी परत येण्यासाठी धावपळ करावी लागते. सर्व नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पण, त्यावर अद्यापही कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करून कलाकार आणि रसिकांची गैरसोय कायमची दूर करावी."

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात नाट्यप्रयोग असला, की नाटक सुरू होण्यापूर्वी किंवा मध्यंतरात बाहेरून चहा-नाष्टा मागवावा लागतो. येथे होणाऱ्या नाट्यप्रयोग-सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे कॅन्टीन असलेच पाहिजे. त्याशिवाय कलाकार-रसिकांसाठी सर्वच नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन असायला हवे. तसेच, ज्यांना कॅन्टीन चालवायला दिले जाईल त्यांच्याकडून जास्त भाडे आकारू नये.

- भाग्यश्री देसाई, नाट्यनिर्मात्या-अभिनेत्री

महापालिकेच्या बहुतांश नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनच नसणे, जिथे आहेत तेथील खाद्यपदार्थांचा दर्जा आणि अवाजवी दर तसेच बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि पार्किंगसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव ही गंभीर बाब आहे. बालगंधर्व रंगमंदिरसारख्या नाट्यगृहातील जुना कॅफेटेरिया अनेक वर्षांपासून बंद आहे. कॅन्टीनची नियमित निविदा काढून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रेक्षक ५०० रुपयांपर्यंतचे तिकीट काढून नाटक पाहायला येतात, त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्व नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात."

- सुनील महाजन, अध्यक्ष, नाट्य परिषदेची कोथरूड शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news