

Pune Sinhagad Road flyover Inauguration
पुणे: पुण्यातील बहुप्रतीक्षित आणि सर्वात लांब अशी ओळख असणार्या सिंहगड रस्त्यावरील पुलाचे आज गुरुवारी (दि. 1 मे) राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. नियोजित कालावधीपेक्षा सहा महिने आधी पुलाचे काम पूर्ण झाले असून, या पुलामुळे या मार्गावरील वाहतूक सुसाट वेगाने होणार आहे. तब्बल 2.2 किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे पुणेकरांचा तब्बल अर्धा तास वेळ वाचणार आहे. तर रोज दीड लाख नागरिक या पुलाचा वापर करणार आहेत.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांनी उड्डाणपुलाच्या कामाची सविस्तर माहिती घेत प्रशासनाचे कौतुक केले. (Latest Pune News)
सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे वडगाव-धायरीच्या दिशेने जाणार्या वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे.
या पुलाचे काम 21 सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले होते. अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल असून, हा उड्डाणपूल मार्चअखेर तर माणिकबाग ते विठ्ठलवाडीदरम्यान उड्डाणपूल डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले होते.
त्यामुळे हा पूल कधी सुरू होणार ? असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला होता. अखेर या पुलाचे काम नियोजित वेळेच्या सहा महिने आधी पूर्ण झाले आहे. आज 1 मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. सध्या एक मार्गिका खुली केली जाणार असल्याने या मार्गावर होणारी वाहतुकी कोंडी आता सुटणार आहे.
पुलाची वैशिष्ट्ये
हा पूल पुण्यातील सर्वाधिक लांब पूल आहे. तब्बल 2.2 किमी लांबीचा पूल आहे. प या पुलामुळे नागरिकांचा अर्धा तासाचा वेळ वाचणार आहे.
भविष्यातील मेट्रोचे काम लक्षात घेऊन हा पूल बांधण्यात आला आहे.
सहा महिन्यांआधीच पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
रोज दीड लाख नागरिक या पुलाचा वापर करणार आहेत.
पूल बांधण्यासाठी खर्च आला 118.37 कोटी.
टप्पा क्र. 1 - राजाराम पुलाजवळील स्वारगेटकडे जाणारा 520 मी. लांब एकेरी उड्डाणपूल ऑगस्ट 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला.
टप्पा क्र. 2 - विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरपर्यंतचा सिंहगडकडे जाणारा 2.2 कि. मी. लांब उड्डाणपूल 1 मे 2025 रोजी खुला
टप्पा क्र. 3 - इंडियन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौकपर्यंतच्या स्वारगेटकडे जाणार्या 1.5 कि. मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सद्य:स्थितीत 90 टक्के काम पूर्ण झाले असून, 15 जून 2025 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. प उड्डाणपुलामुळे इनामदार चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल चौक, ब्रह्मा हॉटेल चौक व गोयल गंगा चौक असे पाच चौक ओलांडून थेट वाहतूक करणे शक्य होणार आहे.
उड्डाणपुलामुळे सुमारे 30 मिनिटे वेळ वाचून दररोज सुमारे दीड लक्ष वाहनांची वाहतुकीची वर्दळ सुलभ होणार आहे.
वाहतुकीची कोंडी सुटल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
उड्डाणपुलामुळे खडकवासला, नर्हे, वडगाव, धायरी, नांदेड गाव तसेच राष्ट्रीय महामार्ग बायपास व सिंहगडकडे जाणे सोयीस्कर होणार आहे.
पादचार्यांना जमीन स्तरावर सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे सोयीचे होणार आहे.