परिंचे: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांच्या पारंपरिक यात्रा उत्सवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 23) पारंपरिक रंगशिंपण करत मारामारीने सांगता झाली. या वेळी भाविकांनी ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळण करत लाखो भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या यात्रा उत्सवाला हळदीने सुरुवात झाली. त्यानंतर देवाचे लग्न, पाणपूजन, भाकणूक ते रंगशिंपण (मारामारी) आदी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. उत्सवाच्या एकूण 13 दिवसांमध्ये श्रीनाथांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांतून भाविक आले होते.
रविवारी रंगशिंपण (मारामारी) सोहळ्यानिमित्त सर्व मानाच्या काठ्या, पालख्या सर्व लवाजम्यासह दुपारी 12 वाजता देऊळवाड्यात आल्या. प्रदक्षिणा होऊन देवाला भारत जमदाडे व परिवार यांच्यामार्फत रंग लावण्यात आला. त्यानंतर मंदिरात दादा बुरुंगले व तात्या बुरुंगले यांच्यामार्फत भाकणूक होऊन दुपारी 1.45 वाजता सर्व काठ्या पालख्यांसोबत उपस्थित लवाजम्यासह भाविकांवर रंगाचे शिंपण करण्यात आले. देवाचा रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविकांनी देऊळवाड्यात गर्दी केली होती.
सकाळपासूनच भाविकांची होणारी गर्दी, दर्शनबारी, वाहनतळ तसेच मंदिरातील सर्व विधी वेळेत पूर्ण करण्याबाबत देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ जातीने हजर राहून व्यवस्था पाहत होते. सोबतच महसूल, पोलिस प्रशासन, कमांडो स्टाफ (शिल्ड सिक्युरिटी), महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी व पीएमपी बससेवा, विद्युतरोषणाई विभाग, अनिरुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट, होमगार्ड, पोलिसमित्र, हाउसकीपिंग विभाग, गावातील सर्व सेवेकरी यांनी उत्कृष्ट काम करत आपली सेवा बजावली.
या वेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त राजेंद्र धुमाळ, अमोल धुमाळ, सुनील धुमाळ, काशिनाथ धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, जयवंत सोनवणे, प्रमिला देशमुख, अलका जाधव तसेच सर्व सल्लागार मंडळी यांनी सर्व यंत्रणांचे आभार मानून यापुढेही सहकार्य राहावे, अशी विनंती केली.