पुणे : शोरूमची तिजोरी फोडून सव्वापाच लाखांची चोरी

गॅस कटर व ग्राइंडरचा वापर; नारायणगाव येथील घटना
Pune Crime News
नारायणगाव येथील मारुती सुझुकी शोरूममध्ये चोरट्यांनी तिजोरी फोडून सव्वापाच लाख रुपये लंपास केले. घटनास्थळाची पाहणी नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार.
Published on
Updated on

नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मारुती सुझुकी शोरूममधील तिजोरी फोडून चोरट्यांनी सव्वापाच लाखांची रक्कम चोरून नेली. ही घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सुरक्षारक्षक साखरझोपेत असताना चोरट्यांनी शोरुममध्ये प्रवेश केला व गॅस कटर व ग्राइंडरचा वापर करून तिजोरी फोडून त्यामधील ५ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम हातोहात पळविली. ही घटना गुरुवारी (दि.१३) पहाटे २ ते ३ च्या सुमारास घडली.

याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. येथील पुणे-नाशिक महामार्गालगत मारुती सुझुकीचे मोटार विक्रीचे शोरूम आहे. शोरूमच्या सुरक्षिततेसाठी खासगी कंपनीचे तीन सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे सुरक्षारक्षक गुरुवारी पहाटे झोपेत असताना दोन चोरट्यांनी खिडकीतून शोरूममध्ये प्रवेश केला. शोरूममधील तिजोरी शोरूमच्या पहिल्या मजल्यावर नेली. त्यानंतर गॅस कटर व ग्राइंडरचा वापर करून तिजोरीचा पत्रा कापला. तिजोरीतील ५ लाख १२ हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून दोन चोरटे आतमध्ये व इतर चोरटे बाहेरच्या बाजूने असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीची फिर्याद कर्मचारी अभिजित भालेराव यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू केला असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले. या ठिकाणी दोन सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असताना चोरटे आतमध्ये येतात व चोरी करून जातात, याचा तपास सुरक्षारक्षकांना लागत नाही. त्यामुळे या चोरीमध्ये स्थानिकांचा काही हात आहे का ? याबाबतदेखील संशय वाढला असून तसा तपास केला जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, दत्ता ठोंबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक साबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत शेलार म्हणाले की, एक महिन्यापूर्वी या ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार झाला होता. त्यावेळीस काळजी घेण्याच्या सूचना सबंधितांना दिल्या होत्या. परंतू त्यांनी याबाबतची कोणतीच दखल घेतली नसल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news