

पुणे : बालेवाडी येथील शुटिंग अकादमीमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या खेळाडू व्यवस्थापकास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रुद्र गौडा चनवीर गौडा पाटील (वय २८, रा. साई चौक, पाषाण. मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने मंगळवारी (दि.१०) निकालात नमूद केले.
पिडीता ही जन्माने अमेरिकन असून तिचे वडील भारतीय आहेत. उन्हाळी सुट्यांमध्ये पिस्तूल नेमबाजी शिकायची इच्छा असल्याने तिच्या आईने तिला पुण्यातील बालेवाडी येथील शूटिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता.खेळाडू व्यवस्थापक या पदावर काम करत असलेल्या रुद्र गौडा पाटील या नराधमाने १४, १५ व २० मे २०१९ रोजी पिडीतेवर अत्याचार केला. याबाबत पिडीतेने आईला सांगितले. त्यानंतर २० मे २०१९ रोजी पिडीतेच्या आईने अकादमी गाठत वरिष्ठांना याबाबत सांगितले. यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पिडीतेच्या आईने अकादमीला ई-मेलद्वारे कळविले.
त्यानंतर दुसर्या दिवशी पिडीतेच्या आजीने हिंजवडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द तक्रार दिली. त्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल व मूळ फिर्यादीतर्फे अॅड. पुष्कर पाटील व अॅड. मयूर धाटावकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलगी व अकादमीमधील अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. दरम्यान, पिडितेला बंदुक व्यवस्थित धरता येत नसल्यामुळे आरोपी तिला ओरडला होता. म्हणून तिने खोटी केस केली असल्याचा बचाव आरोपीने केला. पिडीतेला आरोपीविरुध्द खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचे अॅड. अग्रवाल यांनी न्यायालयास कागदपत्रांआधारे दाखवून दिले. तसेच आरोपीचे आरोप बनावट असल्याचे अॅड. अग्रवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.