

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका, शिवपूजन, शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे अनावरण, अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पुण्यात येत आहेत.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे बुधवारी (दि. 19) सकाळी आयोजित जय शिवाजी, जय भारत या पदयात्रेत 20 हजार विद्यार्थी सहभागी होत असून कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या मानवंदना मिरवणुकीतही हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
याखेरीज उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्याजवळील लाल महालापासून काढण्यात येणार्या शोभायात्रेतही हजारो शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. वानवडी परिसरातूनही अशाच शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त शहरातही विविध ठिकाणी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र मंगळवारी (दि. 18) शहरात विविध भागांत दिसून आले. शिवाजीनगर येथील शिवाजी प्रीपेरेटरी मिल्ट्री स्कूलच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ मंगळवारी अत्यंत देखणी रोषणाई करण्यात आली.
तसेच लष्करी बँड पथकाचाही सराव करण्यात आला. कोथरूड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही अशीच आकर्षक सजावट करण्यात आली असून, बुधवारी (दि. 19) येथेही राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह अनेक मान्यवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीच्या मार्गावर भगव्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, त्यामुळे अवघे शहरच शिवमय झाले आहे.
कात्रज परिसरातील आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसर्या फेजचे लोकार्पण बुधवारी (दि. 19) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याचीही जय्यत तयारी झाली असून, शहरातील बर्याच भागातील वाहतुकीतही पोलिसांनी बदल केले आहेत.