Pune : सद्गुरूंनी सैनिकांना दिला मन : शांतीचा मंत्र

Pune : सद्गुरूंनी सैनिकांना दिला मन : शांतीचा मंत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी शुक्रवारी पुणे येथील दक्षिण कमांडमध्ये जाऊन हजारो सैनिकांशी हृद्य संवाद साधला. सैनिकांनी ताणविरहित कसे काम करावे, कौटुंबिक वातावरण कसे आनंदी ठेवावे, लहान मुलांवरचे संस्कार यावर सुमारे तासभर मार्गदर्शन केले. दक्षिण कमांड येथील मिल्खासिंग मैदानावर शुक्रवारी सायंकाळी याकार्यक्रमाचे आयोजन केले होते. आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी सैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जन. अजय कुमार यांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त सैनिकांनी सहकुटुंब हजेरी लावली. वासुदेव म्हणाले, तुमची रोजची धावपळ सुरूच राहील. त्यातून थोडावेळ काढून ध्यानधारणा सैनिकांनी करायला हवी. जेव्हा सैनिक सीमेवर शहीद होतो तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असते. मात्र त्याचे बलिदान देशसेवेसाठी असल्याने कुटुंब मनावर दगड ठेवून पुढचे आयुष्य जगत असते, ही बाब खूप अस्वस्थ करणारी आहे.

सैनिकांना समाजात मिसळण्याचे प्रशिक्षण गरजेचे

ते म्हणाले, आपल्या देशात सैनिक जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा त्याला समाजात मिसळताना अवघड जाते. त्यासाठी त्याला नोकरीत असताना त्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सद्गुरू यांनी सांगितले. शिस्त आवश्यक आहे, पण कुटुंबात आल्यावर त्याला ती लवचिकता साधता आली पाहिजे.

लहान मुलांना मित्र बनवा

लहान मुलांशी बोलताना आई-वडील नेमके दुसर्यांकडून सल्ला घेतात. आपल्या मुलांशी संवाद स्वतःच्या शैलीत साधा. माझी मुलं माझे ऐकत नाहीत, हट्टी आहेत, अभ्यासच करीत नाहीत अशी पालकांची तक्रार असते. अशावेळी मुलांना जवळ घेऊन मिठी मारा, प्रेमाने बोला. मग बघा जादू तुमच्या मुलांसाठी तुम्ही आदर्श बनाल, असेही त्यांनी सांगितले.

मी महाराष्ट्रात पुन्हा येणार..

प्रचंड गर्दीतून वाट काढत त्यांनी काही मिनिटे पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले, मला मराठी बोलता येत नाही, मी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. मी महाराष्ट्रात पुन्हा येणार आहे. सैनिक, राजकारणी आणि सामान्य माणूस हे माझ्यासाठी सारखेच असून मनातील ताण दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न मी आज केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news