

पुणे: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेकडून आता दुसर्या टप्प्यात चार हजारांहून अधिक सदनिका बांधण्यात येणार आहेत. बालेवाडीसह मुंढवा, धानोरी व वडगाव अशा वेगवेगळ्या भागांत या सदनिका बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेऊन त्यास गती देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या.
सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मंत्री आवास योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत पुणे महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात 2 हजार 658 इतक्या सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हडपसर येथे तीन, खराडी येथे 1 व वडगाव येथे 1 अशा चार प्रकल्पांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही घरे देण्यात आली असून, आठ ते दहा लाख रुपयांपर्यंत या घरांच्या किमती आहेत.
दरम्यान, आता या योजनेंतर्गत दुसर्या टप्प्यात शहरातील बालेवाडी, धानोरी, कोंढवा, हडपसर, वडगाव खुर्द अशा वेगवेगळ्या पाच ठिकाणी तब्बल 4 हजार 162 सदनिका बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी वॉर रूमच्या माध्यमातून या योजनेचा आढावा घेतल्याची माहिती आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.
उत्पन्नाची मर्यादा सहा लाख
सहा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या घटकातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक स्वरूपात घरकुल, भागीदारी तत्त्वावरील परवडणारी घरे, भाडेतत्त्वावरील परवडणारी घरे व व्याज अनुदान योजना अशा चार प्रकारांमध्ये घरे बांधणीचे प्रस्तावित आहे. महापालिकेकडे या योजनेसाठी यापूर्वी 852 जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. या योजनेच्या पुढील प्रक्रियेनंतर नव्याने अर्ज मागविले जाणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेत प्रस्तावित सदनिका
धानोरी- 676
कोंढवा - 736
हडपसर - 2000
वडगाव खुर्द - 465
एकूण - 4173