

पुणे: वाहनांसाठीची हायसिक्युरिटी (एचएसआरपी) नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 असून त्याअगोदच ही नंबर प्लेट तत्काळ ऑनलाइन अर्ज करून बसवावी. 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनाला ही नंबर प्लेट नसेल तर अशा वाहनावर कारवाई केली जाईल, असे पुणे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
01 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या जीएसआर 1162 (ई) नुसार नवीन वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
अधिकृत डिलरकडेच नंबरप्लेट बसवा
नागरिकांनी हायसिक्युरिटी नंबर प्लेट अधिकृत डीलरकडेच बसवावी. ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या घराजवळील डीलरकडून तुम्हाला तुमच्या वाहनाची नंबर प्लेट बसवण्यासाठी फोन येईल. सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन नंबर प्लेट बसवावी. त्याची वाहन संकेतस्थळावर नोंद होईल. मगच वाहनचालकांची वाहन संकेतस्थळावरील कामे करता येतील. अन्यथा त्यांची वाहन संकेतस्थळावरील वाहनासंदर्भातील कामकाज बंद केले जाणार आहे.
..म्हणून ही नंबरप्लेट आवश्यक
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणार्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत.
असा करा अर्ज
परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. एचएसआरपी ऑनलाइन बुकिंग या ऑप्शनवर क्लिक करा. संबंधित आरटीओ निवडा. (एमएच 12, एमएच 14, एमएच 13, एमएच 09) वाहन मालकाला एमएचएचएसआरपीवर पुनर्निर्देशित केले जाईल.
एचएसआरपी बुकिंगसाठी बुक टॅबवर क्लिक करा. वाहन बुकिंगसाठी पुढे जाण्यासाठी वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक टाका. वाहनासोबत (राष्ट्रीय वाहन डेटाबेस) एंटर केलेला डेटा सत्यापित करण्यासाठी प्रविष्ट करा.
वाहनाचे यशस्वी प्रमाणीकरण झाल्यावर, खालील डेटा आपोआप पॉप्युलेट होईल. भारत स्टेज, वाहननोंदणी तारीख, इंधन प्रकार, निर्माता, वाहन प्रकार आणि वाहन श्रेणी. वाहन चालकाने पुढे जाण्यासाठी मालकाचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि बिलिंग पत्ता ओटीपीसह भरावा. वाहन मालकाने दिलेल्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा.
एचएसआरपी फिक्सेशन मोड निवडा म्हणजे फिक्सेशन सेंटर, होम फिक्सेशन अपॉइंटमेंट.मालकाच्या सोयीनुसार (स्थान/पिन कोड आधारित) प्रदर्शित केलेल्या सूचीमधून फिक्सेशन सेंटर निवडा किंवा घरासाठी पत्ता द्या.
भेटीची तारीख आणि वेळ स्लॉट निवडा.सारांशात प्रविष्ट केलेल्या ऑर्डर बुकिंग तपशीलांची पुन्हा पडताळणी आणि पुष्टी करा आणि क्लिक करा. आवश्यक पेमेंट डिजिटल पद्धतीने करण्यासाठी ऑनलाइन पे करा.एचएसआरपी ऑर्डर बुकिंग पावती डाउनलोड करण्यासाठी क्युआर कोड प्रिंट किंवा स्कॅन करा.
सर्व वाहनधारकांनी अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी. मदतीसाठी 7836888822 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकता. 31 मार्च 2025 पर्यंत न बसवणार्या वाहनांचे वाहन 4.0 प्रणालीवर कोणतेही काम होणार नाही. दिलेल्या मुदतीत ही नंबर प्लेट न बसवणार्या वाहनांवर मोटार वाहन कायदा, 1988 व त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल.
- स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधकिारी, पुणे