

पुणे : पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या हाय-प्रोफाइल पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी आज शिवाजीनगर न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. याप्रकरणी मुख्य आरोपी प्रांजल खेवलकरसह पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या निकालामुळे आता प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी वकिलाच्या भूमिकेत कोर्टात हजेरी लावल्याने या प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झाले होते.
पोलीस दलाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना तपासातील महत्त्वाचे टप्पे आणि अडचणी मांडण्यात आल्या. पोलिसांनी खालील मुद्दे कोर्टासमोर ठेवले.
नव्या व्यक्तीचा सहभाग: या प्रकरणात 'राहुल' नावाच्या एका व्यक्तीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. तो पार्टीमध्ये हुक्का भरून देण्याचे काम करत होता. त्याचा या गुन्ह्यातील नेमका सहभाग आणि सूत्रधारांशी असलेले संबंध तपासणे आवश्यक आहे.
अमली पदार्थांचा स्रोत: आरोपींना अमली पदार्थ कोठून मिळाले, या प्रश्नावर ते एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. कोणीही ठोस माहिती देत नसल्याने मूळ पुरवठादारापर्यंत पोहोचण्यात अडथळा येत आहे.
वैज्ञानिक पुरावे: आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (लॅब) पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
कोठडीची मागणी: या गुन्ह्यातील दोन महिलांना न्यायालयीन कोठडी आणि इतर सहा जणांना तपासात सहकार्य करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली.
आरोपी विजय ठोंबरे आणि प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला तीव्र विरोध करत खळबळजनक दावे केले. त्यांनी पोलिसांच्या तपासाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला.
खोटा रिमांड रिपोर्ट : ‘पोलिसांनी मागील वेळेस दिलेला रिमांड रिपोर्टच पुन्हा सादर केला आहे. त्यात काहीही नवीन नाही. ज्या कारणांसाठी एकदा पोलीस कोठडी मिळाली, त्याच कारणांसाठी पुन्हा कोठडी मागणे चुकीचे आहे,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
अमली पदार्थ आणि ईशा सिंग : ‘व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अमली पदार्थ ईशा सिंग नावाच्या महिलेच्या बॅगेतून मिळाले आहेत. मग ज्या महिलेच्या बॅगेत ड्रग्ज सापडले, तिला तुम्ही न्यायालयीन कोठडी मागता आणि आमच्या अशीलला पोलीस कोठडी? हा कोणता न्याय?’ असा थेट सवाल वकिलांनी उपस्थित केला.
राजकीय षडयंत्राचा आरोप : बचाव पक्षाने सर्वात गंभीर आरोप करताना म्हटले, ‘आमचे अशील एका राजकीय व्यक्तीच्या जवळचे असल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात आहे. हा राजकीय सूडबुद्धीने रचलेला सापळा असून, आमचा बळी दिला जात आहे."
जाणीवपूर्वक अडकवल्याचा संशय : "त्या महिलेला (ईशा सिंग) मुद्दाम आमच्यासोबत पाठवून आम्हाला अडकवण्यासाठी तर आणले गेले नाही ना?’ अशी शंकाही बचाव पक्षाने व्यक्त केली, ज्यामुळे या प्रकरणाला एक नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य कोर्टाच्या लक्षात आणून दिले. ‘ही केस अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत असल्याने अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे आरोपींना जामीन देता येणार नाही,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावर बचाव पक्षाने प्रतिवाद करत पोलिसांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. पहिल्या रिमांडमध्ये पूर्ण सहकार्य करूनही पोलीस पुन्हा खोटा रिमांड रिपोर्ट सादर करत असल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालय काय निर्णय देणार यावर या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे. आरोपींना पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी, याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. या निकालामुळे पुणे पोलिसांच्या तपासाला गती मिळणार की बचाव पक्षाचे आरोप खरे ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.