

पुणे: शहरात जुलैच्या पहिल्याच आठवड्यात शहरातील पावसाच्या आकड्यांचे त्रिशतक पार झाले आहे. शिवाजीनगर भागात 6 जुलैअखेर 301 मि.मी.ची नोंद झाली. सरासरीपेक्षा 110 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
घाटमाथ्यावर रविवारी सरासरी 100 ते 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. रात्री 9 नंतर पुणे शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली होती. (Latest Pune News)
आषाढी एकादशीला शहरातील काही भागात उघडीप होती. मात्र, दुपारनंतर काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा रात्री 9 वाजता शहरात संततधार पावसाला सुुरुवात झाली. शनिवारी रात्रीपासूनच घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे रविवारी रात्रीपर्यंत येथे सरासरी 120 मि.मी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात कुरवंडे 39 तर पिंपरी चिंचवड भागात 20 मि.मी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील मान्सून हंगामातील एकूण पाऊस हा 301.1 मि.मी इतका झाला आहे. तर मे मध्ये 267.9 मि.मी पाऊस झाला होता. त्यामुळे 17 मे ते 6 जुलै या सुमारे 50 दिवसांत 568 मि.मी पाऊस झाला आहे. अजून जुलैचे 25 दिवस बाकी आहेत. त्यामुळे यात मोठी भर पडणार आहे.
रविवारचा जिल्ह्यातील पाऊस
कुरवंडे 39, चिंचवड 20, निमगिरी 14, तळेगाव 13, डुडुळगाव 10.5, भोर 9.5, लवळे 4.5, खेड 3, पाषाण 2.3, शिवाजीगर 2.1, नारायणगाव 2, एनडीए 1.5, गिरीवन 0.5, दापोडी 0.5, हवेली 0.5.