

पुणे: पुणे रेल्वेस्थानकाच्या यार्डातील पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या कामांसाठी रविवारी (दि.१४ जून) विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे-दौंड विभागातील डीडीएस पॉइंट क्रमांक २०८/२०९ बदलण्यासाठी अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड इक्विपमेंटचे काम केले जाणार आहे.
हा ब्लॉक सकाळी ८ ते सायंकाळी ५ (एकूण ९ तास) पर्यंत चालेल. या काळात पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ गाड्यांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील. परिणामी, रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या असून, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट (कमी अंतरावर थांबवणे) आणि शॉर्ट ओरिजिनेट (पर्यायी स्थानकावरून सोडणे) करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, वेळापत्रक तपासून घरातून निघावे, अधिक माहितीसाठी 139 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.